Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक नव अपडेट हाती आल आहे. या नव्या अपडेट नुसार राज्यातील काही रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड आता रद्द होण्याची शक्यता आहे. रेशन कार्डधारकांनी आवश्यक पुरावे सादर केले नाही तर त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.
खरंतर, सार्वजनिक वितरण प्रणालीमधून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी पुरवठा विभागाने मोठी कारवाईची तयारी सुरु केली आहे. यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईनंतर अनेक जणांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत.

अपात्र लाभार्थ्यांचा शोध
शिधापत्रिकेच्या आधारे सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांचा शोध 31 मेपर्यंत घेण्यात येणार आहे. यासाठी एक स्पेशल मोहीम राबवली जात असून या मोहिमेमुळे गरजूंना न्याय मिळणार असून अपात्र लाभार्थ्यांवर लगाम बसणार आहे, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
वास्तविक, सध्या ई-केवायसीच्या अंमलबजावणीमुळे अनेक अपात्र लाभार्थ्यांची माहिती उघड झाली आहे. दरम्यान आता यापुढील टप्प्यात रेशन कार्ड धारकांच्या काही पुराव्यांची पडताळणी केली जाणार आहे.
रेशन कार्ड रद्द होणार
यासाठी रेशन कार्डधारकांना पुरवठा विभागाकडे काही पुरावे सादर करावे लागणार आहे. पात्रता निश्चित करण्यासाठी हे पुरावे पुरवठा विभागाकडे सादर करणे अनिवार्य असून जे लोक हे पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरतील किंवा ज्या लोकांचे पुरावे योग्य नसतील त्यांच्या रेशन कार्ड आगामी काळात रद्द होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून प्रत्येक रेशन कार्डधारकाच्या वार्षिक उत्पन्नाची तसेच रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. पुरावा सादर न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
रेशन दुकानदारांचीही जबाबदारी
दरम्यान, या तपासणी मोहिमेस रेशन दुकानदारांचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला स्वतःच्या रहिवासीपणाचा किमान एक पुरावा जोडून एक अर्ज सादर करावा लागणार आहे.
भाडेकरारपत्र, मालकी हक्काचे दस्तऐवज, गॅस कनेक्शन पावती, बँक पासबुक, वीजबिल, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणतीही एक प्रत चालणार आहे.
सदर अर्ज रेशन दुकानदारांमार्फत जमा करून ते पुरवठा विभागाकडे सादर केले जाणार आहेत. त्यामुळे लाभ घेणाऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करणे गरजेचे असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.