Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर रेशन कार्ड शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या स्वस्त दरातील अन्नधान्याच्या लाभासाठी आवश्यक असते. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासनाकडून स्वस्त दरात गहू अन तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच काही रेशन कार्डधारकांना साखर देखील दिली जात आहे.
महत्वाची बाब अशी की शासनाकडून दिला जाणारा गहू आणि तांदूळ कोरोना काळापासून मोफत मिळत आहे. रेशन कार्डचा वापर हा शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी तर होतोच शिवाय हे एक महत्वाचे शासकीय कागदपत्र सुद्धा आहे.
याचा वापर अनेक शासकीय कामांमध्ये केला जातो. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असते. सध्या महाराष्ट्रात ज्या लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड लागते.
पण जर हेच महत्त्वाचे रेशन कार्ड आपल्याकडून हरवले मग काय करावे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का? अहो मग चिंता करू नका आज आपण याच संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन कार्ड हरवले तर काय करणार ?
तुमच्याकडील रेशन कार्ड तर हरवले तर आता तुम्हाला पुरवठा विभागाकडून ई-रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिधापत्रिका हरवल्यास डुप्लिकेट शिधापत्रिका बनवण्यासाठी एक ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.
रेशन दुकान किंवा अन्न विभाग कार्यालय किंवा किओस्क सेंटरमधून तुम्हाला अर्ज उपलब्ध होणार आहे. फूड सेफ्टी पोर्टल वर जाऊन तुम्ही डुप्लिकेट रेशन कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठीचा अर्ज डाउनलोड करू शकता.
अर्ज प्राप्त केल्यानंतर, तो अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. या अर्जात तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक, शिधापत्रिकेत नोंद केलेले कुटुंबप्रमुखाचे नाव, वडील व आईचे नाव, मोबाइल नंबर इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
यानंतर ई-रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना ई- रेशन कार्डद्वारेचं धान्य सुद्धा खरेदी करता येणार आहे. ई- रेशन कार्डमुळे कार्डमधील नाव कमी करणे, नोंदवणे, ट्रान्सफर करणे, अशी कामे करण्यासही मदत होणार आहे.
सरकारने याच कामांसाठी रेशन कार्ड धारकांसाठी ई-रेशन कार्ड प्रणाली सुरु केली आहे. या नवीन प्रणालीमुळे येत्या काही महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व रेशन कार्ड ई- कार्डमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत.
यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून पुरवठा विभागात प्रायोगिक स्तरावर या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. म्हणजेच भविष्यात आता ई-रेशन कार्डच पाहायला मिळणार आहेत.