RBI On Repo Rate And Inflation Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वसामान्य नागरिकांना दोन-दोन गुड न्युज दिल्या आहेत. आता सर्वसामान्य नागरिकांचे पाचही बोट तुपात राहतील असे दिसत आहे. खरंतर आज पाच वर्षांनी प्रथमच आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून महागड्या कर्जामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात होती.
तरीही आरबीआयकडून रेपो रेट काही कमी केला जात नव्हता. रेपो रेट कमी झाला पाहिजे अशी अनेकांची मागणी होती. सातत्याने याबाबत चर्चा सुद्धा रंगत होत्या. मात्र निर्णय काही होईना, आज अखेर आरबीआय ने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवर येणार आहे. आतापर्यंत हा दर 6.50% इतका होता. या निर्णयामुळे आता गृह कर्जासहित सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहेत. म्हणजेच सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर आता कमी होतील अशी आशा आहे.
एकीकडे आरबीआय ने सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त केले आहे तर दुसरीकडे महागाई दराबाबतही आरबीआयचा अंदाज सर्वसामान्यांना सुखद धक्का देतोय. जर कर्ज स्वस्त झाले तर सामान्य माणसाच्या हातात अधिक पैसे वाचतील अन महागाई कमी झाली तर कमी खर्च करावा लागणार आहे.
आरबीआयने शुक्रवारी पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26 साठी किरकोळ महागाईचा अंदाज वर्तवला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 4.2% राहिल असा आरबीआयचा अंदाज आहे तर या चालू आर्थिक वर्षात, हा दर 4.8% असा राहणार अस सांगितलं गेलं आहे.
आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणालेत की, पुरवठ्याच्या मोर्चावर सध्या कोणताही धक्का बसण्याची शक्यता नाहीये. यासह, खरीफ पिकांचे चांगले उत्पादन, हिवाळ्यात भाजीपालांच्या दरात नरमाई आणि रबी पिकांबद्दल अनुकूल वातावरण या सर्व गोष्टींचा विचार केला असता अन्न महागाईत लक्षणीय घट झाली पाहिजे.
ते म्हणालेत की, मुख्य (कोर) महागाई वाढण्याचा अंदाज आहे, परंतु ही महागाई मध्यम पातळीवर आणि थोड्याच काळासाठी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जागतिक वित्तीय बाजारपेठेतील उर्जेच्या किंमती आणि प्रतिकूल हवामान घटनांमध्ये असुरक्षिततेसह महागाई वर जाण्याचा धोका कायमच आहे.
या सर्व गोष्टी लक्षात ठेवून, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाई चालू आर्थिक वर्षात 4.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4.4 टक्के राहील असा अनुमान आहे. 2025-26 मध्ये किरकोळ महागाई दर 4.2% राहिल असा अंदाज आहे कारण की, पुढच्या वर्षी सामान्य मॉन्सूनचा अंदाज आहे.
किरकोळ महागाई दर पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 4.5 टक्के, दुसर्या तिमाहीत 4.0 टक्के, तिसर्या तिमाहीत 3.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4.2 टक्के राहील असा अंदाज आहे.
एकंदरीत महागाईबाबत आरबीआयचा हा अंदाज खरा ठरला तर सामान्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब राहणार असून यामुळे सर्वसामान्यांची बचत वाढेल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय.