Ring Road News : नाशिक पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहराला रिंग रोडची भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. खानदेशी नगरी जळगाव शहरात सुद्धा आता रिंग रोड तयार होणार आहे. खरे तर जळगाव रिंग रोडचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
शहरातील रिंग रोड साठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यानंतरही जळगावला अद्याप रिंग रोडची भेट मिळू शकली नाही पण आता खासदार स्मिता वाघ यांच्या पुढाकारातून रिंग रोडचा प्रश्न निकाली निघणार आहे.

खरेतर जळगाव शहरातील वाहतूक कोंडी ही स्थानिक नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातूनच राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने पाळधी, नशिराबाद, शिरसोली, ममुराबाद, आसोदा इत्यादी भागांतून येणाऱ्या वाहनांना दाट वाहतूक असलेल्या मध्यवस्तीवरूनच मार्गक्रमण करावे लागत होते.
परिणामी मुख्य रस्त्यांवर सातत्याने कोंडी निर्माण होत होती. या वाढत्या समस्येची दखल घेत जळगाव शहराभोवती अंदाजे ४० किलोमीटरचा रिंग रोड उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनाच्या पातळीवर प्रलंबित होता.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रस्तावाचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला; मात्र निधीअभावी आणि भूसंपादनातील अडचणींमुळे कामाला गती मिळू शकली नव्हती.
आता या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून चालना मिळाली असून रिंग रोडची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) सुपूर्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
धरणगाव, जळगाव आणि एरंडोल तालुक्यातील तब्बल ११ गावे जोडणारा हा रिंग रोड पाळधी – दोनगाव – फुपनगरी – ममुराबाद – आसोदा – तरसोद – नशिराबाद – मन्यारखेडा – कुसुंबा – मोहाडी – टाकरखेडा असा प्रस्तावित आहे.
या मार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य मार्गाचा दर्जा देऊन सर्वेक्षण अहवाल शासनाकडे सादर केला होता; मात्र नद्यांवरील पूल, भूसंपादन आणि आवश्यक निधीची तरतूद न झाल्याने प्रकल्प थंडबस्त्यात गेला होता.
दरम्यान, खासदार स्मिता वाघ यांनी तरसोदमार्गे विमानतळाला जोडणाऱ्या मधल्या रस्त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यानंतर केंद्राने NHAI ला संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. रिंग रोडचे अंतिम स्वरूप निश्चित करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम खासगी एजन्सीकडे सोपविण्यात येणार आहे.
यासाठी महामार्ग प्राधिकरणाने ऑनलाईन निविदाही प्रसिद्ध केली असून निविदा प्रक्रियेनंतर DPR तयार करण्यास सुरुवात होणार आहे.
DPR सादर झाल्यानंतरच रिंग रोडचे वास्तविक कामकाज पुढे जाईल, अशी माहिती जळगाव येथील प्रकल्प संचालक रावसाहेब साळुंके यांनी दिली.
शहरातील वाहतूक ताण कमी करणे, ग्रामीण भागांना थेट जोडणी मिळवून देणे आणि भविष्यातील शहरी विस्ताराला योग्य दिशा देण्यासाठी हा रिंग रोड अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.













