Samruddhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले. त्यानुसार नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदीया आणि भंडारा-गडचिरोली या तीन विस्तारित महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारीअखेर नव्याने निविदा काढण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
या तिन्ही महामार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहे. नागपूर-गोंदीया आणि भंडारा-गडचिरोली महामार्गाचे सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून, नागपूर-चंद्रपूर महामार्गाचे उर्वरित भूसंपादनही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

भूसंपादन पूर्ण होताच निविदा प्रक्रिया राबवून येत्या काही महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे.
यापूर्वी या तीनही महामार्गांसाठी २०२४ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि जी.आर. इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या कंपन्यांनी बाजी मारली होती.
मात्र, निविदा २८ ते ४० टक्के अधिक दराने आल्याने तसेच भूसंपादन पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी प्रकल्प खर्च वाढण्याचा धोका लक्षात घेऊन या निविदा रद्द करण्यात आल्या आणि प्रकल्प लांबणीवर पडले.
दरम्यान, नागपूर-चंद्रपूर महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र बाधित होणार असल्याने सुधारित संरेखन तयार करून वनक्षेत्र वाचविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुधारित संरेखनाचा प्रस्ताव पर्यावरण परवानगीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे हा महामार्ग काही काळ रखडला होता, मात्र आता या प्रक्रियेलाही गती देण्यात येत आहे.
एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीअखेरीस तिन्ही महामार्गांसाठी नव्याने निविदा काढल्या जातील आणि याच वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.
काम सुरू झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षांत हे महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे विस्तारित महामार्ग सेवेत दाखल झाल्यास विदर्भातील नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदीया आणि भंडारा-गडचिरोली दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.













