Samruddhi Mahamarg : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होतील अशी स्थिती आहे. अशातच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचे तीन टप्पे वाहतुकीसाठी सुरू आहेत. खरे तर या महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता.
नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सुरू झाला यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरविर या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले त्यानंतर 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.
आता या महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा येत्या काही दिवसांनी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शेवटच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून फेब्रुवारी 2025 मध्ये हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांकडून समोर येत आहे.
हा महामार्ग प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असून यामुळे नागपूर ते मुंबई हा 16 तासांचा प्रवास अवघ्या आठ तासात होणे शक्य होणार आहे.
हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जात आहे. या मार्गांवर कमाल 150 किमी प्रतितास या वेगाने वाहने धावू शकतात.
या महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत. या महामार्ग प्रकल्पासाठी जवळपास 67 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग प्रकल्प दहा जिल्ह्यांमधून जातो आणि याचा अप्रत्यक्षरीत्या 14 जिल्ह्यांना फायदा होतोय.
खरे तर या महामार्ग प्रकल्पाचा शेवटचा टप्पा हा गेल्या वर्षीच सुरू होणार होता. मात्र नियोजित वेळेत या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले नाही आणि यामुळे याचे उद्घाटन लांबले मात्र आता या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे.