Sanjay Raut On Anna Hazare : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. सध्या राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी करत आहेत. ज्या जागेवर राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत त्या उमेदवारांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. तसेच काही ठिकाणी इच्छुक उमेदवार देखील प्रचार करत आहेत. अशातच मात्र देशाच्या राष्ट्रीय राजधानीत एक मोठी घडामोड घडली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीसहित संपूर्ण देशभरात यावरून हाहाकार माजला आहे. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप या ठिकाणी विरोधकांनी केला आहे.
विरोधकांनी भाजपा प्रणित एनडीए सरकारला या मुद्द्यावर चांगलेच धारेवर धरले आहे. महाविकास आघाडी देखील यावर भाजपा विरोधात चांगलीच आक्रमक बनली आहे. राज्यातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या या कारवाईचा निषेध केला आहे.
दरम्यान याच संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. सध्या त्यांच्या याच विधानाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा पाहायला मिळत आहे.
खासदार संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या या कारवाईबाबत बोलताना भाजपच्या कारभाराला हुकूमशाहीची उपमा दिली आहे. तसेच इलेक्ट्राेल बाँडचादेखील हिशोब द्यावा असे म्हटले आहे. एवढेच नाही तर आम्ही केजरीवाल आणि आम आदमी पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही देखील राऊत यांनी दिली.
यावेळी पत्रकारांनी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल हे एके काळचे सहकारी होते, याकडेही राऊत यांचे लक्ष वेधले. यावेळी खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
ते म्हटलेत की, ‘अण्णा हजारे यांना अगोदर जागे करा. कुठे आहेत, ते बघा. आता मला माहीत नाही, ते कुठे असतात ते. एकेकाळी आंदोलन होते, या साऱ्यांच्या विरोधात त्यांचे. आता ते कुठे हरवले आहेत, ते माहीत नाही.’
भाजपला त्यांचा पराभव दिसतोय
याशिवाय खासदार राऊत यांनी असे म्हटले आहे की, ‘केजरीवाल यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे, भाजपला त्यांचा पराभव दिसतोय. भाजपमध्ये येण्यासाठी केजरीवाल यांच्यावर प्रचंड दबाव होता आणि अजूनही आहे. तसा आमच्यावरदेखील दबाव आहे.
पण आम्ही घाबरलो नाही. हुकूमशाही विरोधात आम्ही उभे आहोत. उबाठा शिवसेना गट अरविंद केजरीवाल यांच्यामागे आणि त्यांच्या आम आदमी पार्टीच्या मागे ठामपणे उभा आहे.’
यावेळी खासदार महोदय यांना भष्ट्राचाराच्या विरोधात अण्णा हजारेंबरोबर लढाई करणारे अरविंद केजरीवाल हे आता भष्ट्राचाराच्या आरोपावरून अटकेत आहेत याकडे कसे पाहता असा मोठा प्रश्न उपस्थित केला. यावर राऊत यांनी ‘अण्णा आता कुठे हरवले आहेत, ते माहीत नाही’, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे.