SBI Bank Job : सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) २ हजारपेक्षा अधिक पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.
या भरतीअंतर्गत सर्किल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी एकूण २२७३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून अर्जप्रक्रिया २९ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली आहे.

या भरतीमध्ये देशभरातील १६ सर्किल्समध्ये नियुक्ती केली जाणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, गुजरात, आसाम, तेलंगणा, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये ही भरती होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून त्यासाठी ibpsreg.ibps.in किंवा sbi.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
तसेच मेडिकल, इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि कॉस्ट अकाउंटंट (CMA) पदवीधारक उमेदवारही या भरतीसाठी पात्र असतील. उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे.
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे. सुरुवातीची बेसिक सॅलरी ४८,४८० रुपये असून एकूण वेतनश्रेणी ४८,४८० ते ८५,९२० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही नोकरी अत्यंत फायदेशीर मानली जात आहे.
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, मुलाखत (इंटरव्ह्यू) आणि स्थानिक भाषा चाचणी अशा टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. अर्ज करताना सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
या भरतीची अंतिम अर्ज तारीख १८ फेब्रुवारी २०२६ असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएसमार्फत राबवली जाणार आहे.













