SBI Mutual Fund IPO : भारतातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंट (SBI Funds Management) लवकरच शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या आयपीओसाठी (IPO) फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत मसुदा दस्तऐवज (Draft Red Herring Prospectus) दाखल करण्याची शक्यता आहे.
एप्रिलमध्ये आयपीओ खुला करण्याचा कंपनीचा मानस असून, ही प्रक्रिया बाजारातील स्थिती आणि सेबीच्या मंजुरीवर अवलंबून असणार आहे.

एसबीआय फंड्स मॅनेजमेंट ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि फ्रान्सची आघाडीची ॲसेट मॅनेजमेंट कंपनी अमुंदी (Amundi) यांचा संयुक्त उपक्रम आहे.
प्रस्तावित आयपीओमध्ये एसबीआय आपला ६.३ टक्के तर अमुंदी ३.७ टक्के हिस्सा विकणार असून, एकूण १० टक्के भागीदारी ऑफर फॉर सेल (OFS) मार्गे बाजारात येणार आहे. या आयपीओमधून कोणताही नवीन भांडवल उभारणीचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कंपनीच्या आर्थिक स्थितीकडे पाहता, ३१ डिसेंबर २०२५ अखेर एसबीआय फंड्स मॅनेजमेंटकडे तब्बल १२.५ लाख कोटी रुपयांची असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीने २,५३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
गुंतवणूक बँकरांच्या अंदाजानुसार, कंपनीचे मूल्यांकन १२ ते १४ अब्ज डॉलर इतके असू शकते, तर आयपीओचा आकार १.२ ते १.४ अब्ज डॉलर दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
या आयपीओच्या व्यवस्थापनासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट्स, कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस बँक यांच्यासह एकूण नऊ बँकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरुवातीला सिटीग्रुप आणि जेपी मॉर्गन यांसारख्या जागतिक बँका शुल्कावरून झालेल्या मतभेदांमुळे या प्रक्रियेतून बाहेर पडल्या होत्या. अंतिम मूल्यांकन मसुदा दस्तऐवज दाखल करताना निश्चित केले जाईल.
दरम्यान, भारतीय आयपीओ बाजार सध्या तेजीत असून २०२५ मध्ये १०३ कंपन्यांनी १.७६ लाख कोटी रुपये उभारले आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट आणि कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंटच्या यशस्वी लिस्टिंगनंतर, एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













