Marathi News : मानवी इतिहासातील एक विलक्षण स्थलांतर सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी घडले असून, या स्थलांतरादरम्यान लाखोंची मानवी लोकसंख्या दक्षिणपूर्व आशियामधून ऑस्ट्रेलिया खंडात पोहोचली. हे लोक आता आधुनिक ऑस्ट्रेलियाचे मूळ रहिवासी असल्याचे म्हटले जाते.
परंतु, हजारो वर्षांपूर्वी मानवाने एवढा मोठा सागरी प्रवास कसा केला असेल? हे गूढ आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही उलगडलेले नाही. हा प्रवास पूर्ण होण्यास किती वेळ लागला आणि या काळात कोणते मार्ग काढले गेले असावेत

याविषयी संशोधकांना या स्थलांतराबद्दल आश्चर्य वाटत राहिले आहे. हे रहस्य उकलण्यासाठी संशोधकांनी केलेल्या नवीन संशोधनात त्याचे संभाव्य उत्तर समोर आले असून, या संशोधनात शास्त्रज्ञांना समुद्रात बुडालेल्या एका खंडाचा शोध लागला आहे.
एका जर्नलमध्ये २३ एप्रिलला प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ७० हजार वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वी शेवटच्या हिमयुगाच्या मध्यभागी होती, तेव्हा ऑस्ट्रेलिया हा साहुल नावाचा एक मोठा प्रदेश होता. हिमनदीमुळे समुद्राच्या पातळीत घट झाल्याने ऑस्ट्रेलिया उत्तरेला पापुआ न्यू गिनी आणि दक्षिणेला टास्मानियाशी जोडले गेले.
हिमयुगानंतर, जागतिक तापमान वाढले आणि समुद्राची पातळी वाढली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा मध्यभाग पाण्याखाली गेला आणि ऑस्ट्रेलियाची मुख्य भूमी वेगळी झाली. शास्त्रज्ञांच्या मते, न्यू गिनी सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियापासून वेगळे झाले होते, तर तास्मानिया सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियापासून वेगळे झाले होते.
संशोधकांनी परिस्थितीवर आधारित मॉडेल विकसित करण्यासाठी या माहितीचा वापर केला. यामध्ये आग्नेय आशियातील दोन ठिकाणांहून, पश्चिम पापुआ आणि तिमोर सी शेल्फ, तसेच आधुनिक लँडस्केपमध्ये विखुरलेल्या पुरातत्त्वीय स्थळांवरून आग्नेय आशियापासून ऑस्ट्रेलियाकडे स्थलांतराचे संभाव्य मार्ग समाविष्ट आहेत.
नवीन लँडस्केप उत्क्रांती मॉडेलमधून या क्षेत्रांच्या पर्यावरणाची अधिक वास्तववादी माहिती देत असून, त्यानुसार शिकार करणाऱ्या समुदायांनी साहुल ओलांडले होते. या संशोधनात लँडस्केप वैशिष्ट्ये आणि अन्न उपलब्धतेवर आधारित संभाव्य मार्गांचा शोध घेण्यात आल्याचे सिडनी विद्यापीठातील स्कूल ऑफ जिओसाइन्सेसचे प्रा. ट्रिस्टन सायलेस यांनी सांगितले.
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे मार्ग समुद्र किनाऱ्यावरून आणि थेट खंडाच्या आतील भागात, मोठ्या नद्या आणि धबधब्यांमधून जातात. या स्थलांतरादरम्यान, मानव दरवर्षी १.१५ किलोमीटर वेगाने पुढे जात राहिला.
त्यात एकेकाळी साहुलच्या उत्तरेकडील शेल्फवर सुमारे पाच लाख लोक राहत होते. मात्र हा भाग सध्या पाण्याखाली असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे.