Ahmednagar News : विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांना अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रातील देशाची प्रगती समजावी, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाशी असलेल्या संबधांचा परिचय व्हावा,
यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या युवा विज्ञान कार्यक्रमासाठी (युविका) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमधील साची रमाकांत राठी या विद्यार्थिची निवड झाली आहे.

या कार्यक्रमासाठी देशभरातील तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून अवघ्या ३५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील १३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्त्रोच्या वतीने
या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दहा दिवसांच्या या निवासी कार्यशाळेसाठी देशभरात असलेल्या इस्रोच्या सात केंद्रांवर प्रत्येकी ५० विद्यार्थी याप्रमाणे एकूण ३५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
या कार्यक्रमासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांना तीन विद्यार्थ्यांची निवड करता येते, तर अन्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करुनही या कार्यक्रमातील सहभागासाठी प्रयत्न करता येतो. या प्रक्रियेत देशभरातून तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते.
त्यातील ३५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील साची रमाकांत राठी विद्यार्थीनीचा समावेश आहे. पुढील महिन्यात १२ ते २५ मे दरम्यान अहमदाबादच्या इस्त्रो केंद्रात ही कार्यशाळा होणार आहे.
राज्यातील अवघ्या १२ विद्यार्थ्यांमध्ये ध्रुवच्या साची राठीची निवड झाल्याबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्य अर्चना घोरपडे यांनी कौतुक केले आहे.













