Shaktipith Expressway : महाराष्ट्रात अलीकडेच समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नुकताच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास वेगवान झालाय. दरम्यान याच समृद्धी महामार्गाच्या धरतीवर महाराष्ट्रात आणखी एक महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
हा महामार्ग नागपूर आणि गोवा यांना कनेक्ट करणारा असून या मार्गामुळे राज्यातील अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्र सुद्धा जोडली जाणार आहेत. हा मार्ग राज्यातील तीन महत्त्वाची शक्तीपीठ जोडणारा आहे आणि म्हणूनच याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.

मात्र या 801 किलोमीटर लांबीच्या महामार्गाला शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध दाखवला जात आहे. शेतकऱ्यांसहीत विरोधी पक्षातील नेते सुद्धा या महामार्गाला मोठा विरोध दाखवत आहेत. सत्ता पक्षातील नेते सुद्धा याला विरोध दाखवत आहेत.
अशातच आता या महामार्ग प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महामार्गाला होणारा विरोध पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महामार्गाचा रूट बदलला जाईल अशी घोषणा केली आहे. महायुती सरकारने या मार्गाचे alignment म्हणजे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गाचा रूट बदलतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाला होणारा विरोध स्थानिक जनतेचा कमी आणि राजकीय नेत्यांचा अधिक आहे असे सुद्धा स्पष्ट मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते शक्तीपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा प्रकल्प आहे.
नागपूर – गोवा मार्ग राज्यातील अनेक महत्वपूर्ण जिल्ह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी या प्रकल्पाचा राज्याला मोठा फायदा होणार आहे. पण, धाराशीव परिसरात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर या प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत जोरदार विरोध दाखवला आहे.
दरम्यान आता याचं विरोधाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने या मार्गात महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार कोणावरही अन्याय करणार नाही असे सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित केले असून आता हा महामार्ग धाराशिव ऐवजी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून तयार करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
चंदगड येथे काही शेतकऱ्यांनी स्थानिक आमदाराच्या नेतृत्वात एक मोर्चा काढला होता ज्यात शेतकऱ्यांनी हा मार्ग आमच्या भागातून यावा अशी आग्रही मागणी उपस्थित केली होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने आता या भागातून हा महामार्ग प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला आहे.