Shaktipith Expressway : सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात अर्थातच विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरे तर, शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केला जाणार असून या महामार्गाचे नवीन अलाइनमेंट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. CM फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या अलाइनमेंटची माहिती विधानसभेत दिली असून नव्या अलाइनमेंटनुसार हा महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाणार आज आपण याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, शक्तीपीठ मार्गाला सर्वात जास्त विरोध कोल्हापूर जिल्ह्यात झाला. कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यातही या महामार्ग प्रकल्पाला प्रचंड विरोध दाखवण्यात आला आणि याच तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाची दिशा बदलण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरे तर, मध्यंतरी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातून कोल्हापूर जिल्हा पूर्णपणे वगळला जाईल अशा चर्चा होत्या. मात्र शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्हा पूर्णतः वगळण्यात आला नसून जिथे विरोध होता तो भाग या महामार्गातून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे नव्या अलाइनमेंट नुसार स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेल्या अलाइनमेंट नुसार हा महामार्ग सोलापूर पासून पंढरपूर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातून जाणार आहे. थोडक्यात शक्तिपीठ मार्गातून कोल्हापूर तसेच सांगली जिल्हा वगळण्यात आलेला नाही.
महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातूनच जाणार आहे फक्त अधिक व्यवहार्य आणि विकास पूरक दिशा निवडण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री म्हणालेत की हा राज्यातील एक महत्त्वाकांक्षी आणि मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असा प्रकल्प आहे.
हा महामार्ग नागपूर – गोवा आहे पण याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांनी सांगितले की सुरुवातीच्या अलाइनमेंटबाबत काही आक्षेप होते, मार्ग ठरवताना काही त्रुटी राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या त्रुटी शासनाच्या लक्षात आणून दिल्या.
यानुसार आता नवे अलाइनमेंट तयार करण्यात आले असून या नव्या महामार्गाचा उद्देश राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणे नसून जिथे अजून कनेक्टिव्हिटी नाही तो भाग जोडणे हा आहे. तसेच या महामार्गाचा महत्त्वाचा उद्देश मागास भागात विकास घडवून आणण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या नागरिकांनी मोर्चा काढून हा मार्ग आमच्या भागातून व्हावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आता हा महामार्ग पंढरपूर जवळून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून जाणार आहे.
नव्या अलाइनमेंट मध्ये वन जमीन फारच कमी प्रमाणात बाधित होणार आहे आणि यामुळे महामार्गाच्या कामासाठी परवानगी मिळवताना फारसा अडथळा सुद्धा येणार नाही. महत्वाची बाब म्हणजे जुन्या अलाइनमेंट ला विरोध करणारे बहुतांशी लोक आता नव्या अलाइनमेंट ला पाठिंबा दाखवत असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान या महामार्गाचे काम 2026 मध्ये सुरू होणार अशी पण माहिती त्यांनी यावेळी दिली. नव्या प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास कालावधी दहा तासांनी कमी होणार आहे. नागपूर गोवा प्रवास या नव्या महामार्गामुळे फक्त आठ ते नऊ तासांमध्ये पूर्ण होईल असा दावा केला जातोय.













