Shetkari Karjmafi : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट आहे शेतकरी कर्जमाफी बाबत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार? याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी थेट शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठ्या चर्चा सुरू आहेत.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून उपस्थित केली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना आमचे सरकार आले तर सरसकट कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असे आश्वासन सुद्धा दिले होते.

आता महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापित झाले आहे, मात्र अजूनही शेतकरी कर्जमाफी बाबत कोणता सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मोठा वादळी पाऊस झाला होता आणि यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची पिके तर सोडाच जमीनही खरडून निघाली आहे. यामुळे या हंगामात तर शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे वाया गेले आहेत शिवाय पुढच्या हंगामात पण शेतकऱ्यांना शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याची वास्तविकता आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पदरमोड करून पीक जगवली होती मात्र पावसाने सारं काही हिसकावून घेतलं. आता शेतकऱ्यांना पुन्हा उभारी घ्यायची असेल तर त्यांना भांडवल लागेल आणि भांडवली साठी बँकांचे दरवाजे ठोठावे लागतील.
पण बँका आधीच कर्ज असल्याने शेतकऱ्यांना कर्ज नाकारणार आहेत. यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली जात आहे. यासाठी बच्चू कडू सुद्धा मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी एक मोठे आंदोलन उभारले आहे. दरम्यान याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.
शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णय 30 जून 2026 पूर्वी घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणालेत की, कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे.
ही समिती एप्रिल पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर मग जून अखेरपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा योग्य तो निर्णय घेतला जाईल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनातील शिष्ट मंडळाशी सरकारने सह्याद्री अतिथी गृह येथे चर्चा केली.
यावेळी शिष्टमंडळाचे प्रमुख प्रतिनिधी तसेच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर अन्य मंत्री उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्ष स्थान मुख्यमंत्र्यांकडे होते.
दरम्यान अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज असल्याने आम्ही बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच कर्जमाफीचा निर्णय हा जून पर्यंत घेतला जाईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.













