Shevga Lagwad : महाराष्ट्रात फार पूर्वीपासून शेवगा लागवड केली जाते. शेवग्याची व्यावसायिक शेती अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये शेवगा लागवड पाहायला मिळते.
कमी पाणी, कमी खर्च आणि जास्त उत्पादन यामुळे शेवगा लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आहे आणि शेवग्याची लागवड या कारणांमुळे वाढली. शेवग्याची पाने फुले आणि शेंगा सारं काही गुणकारी आहे.

यांना बाजारात चांगली मागणी सुद्धा आहे. शेवग्याच्या शेंगा तसेच पाना-फुलांपासून बनणारी पावडर बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाते. शेवग्याचे संपूर्ण झाड औषधी असते, यामुळे याची लागवड शेतकऱ्यांना अधिक फायद्याची ठरत आहे.
निर्यात मागणी आणि प्रक्रिया उद्योगातून मिळणारे आर्थिक लाभ पाहता हे पीक आता व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.
दरम्यान जर तुम्ही ही शेवगा लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही दोन वाणाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
ओडिसी: आंतरपीकासाठी उत्तम पर्याय
ओडिसी हा वाण तामिळनाडू कृषी विद्यापीठाची देणगी असून महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा लागवड तसेच आंतरपीक पद्धतीत मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. झाडाची वाढ जोमदार होत असल्याने कमी देखभाल, कमी पाणी आणि कमी खताच्या गरजेमुळे हा वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो.
दुष्काळप्रवण भागातही याचे उत्पादन चांगले येते. व्यापारीदृष्ट्या शेंगांची एकसारखी लांबी आणि गुणवत्ता टिकून राहते, त्यामुळे स्थानिक बाजारात सातत्याने त्याला मागणी असते.
पी.के.एम.-1: लवकर उत्पादन देणारा चवदार वाण
पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेला पी.के.एम.-1 वाण महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. या वाणाच्या शेंगांना आलेला पोपटी रंग, दोन ते अडीच फुटांची सरासरी लांबी आणि समृद्ध गरामुळे देशांतर्गत बाजाराबरोबरच निर्यात बाजारातही या वाणाला मोठी मागणी आहे.
विशेष म्हणजे, रोप लावल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत शेंगा येऊ लागतात. महाराष्ट्रातील हवामानात या वाणाला वर्षातून दोनदा उत्पादन मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांची कमाई जवळपास दुप्पट होऊ शकते.
कमी कालावधीत येणारे उत्पादन आणि सातत्यपूर्ण बाजारभाव यामुळे हा वाण व्यावसायिक दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानला जातो.













