Shirdi News : श्रीक्षेत्र शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो, लाखों भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यातील अनेक भाविक साईबाबांच्या चरणी हजारो, लाखो, करोडो रुपयांचे दान देतात. काही जण सोने-चांदी, हिरे-मोती दान करतात. पण, महाराष्ट्रातील हिंगोली येथील ८५ वर्षीय नरसिंहराव बंडी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई साईचरणी अर्पण केली आहे.
नरसिंहराव यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक-एक रुपया जमा करून जे ३ लाख रुपये जमवलेत ते पैसे त्यांनी शिर्डी साईबाबा संस्थानला दान केलेत. यामुळे नरसिंहराव यांची या श्रीमंतीची आणि दानाची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरु आहे. नरसिंहराव हे मूळचे हैदराबादचे, मात्र ते हैदराबादहून हिंगोली येथे स्थायिक झाले.
ते सुतारकाम करतात. हिंगोली येथे त्यांनी शेतजमीन विकत घेतली होती. दरम्यान नरसिंहराव यांनी आपली हीच शेतजमीन विकून साईबाबांच्या चरणी तीन लाखाची कमाई अर्पण केली आहे. मूळचे हैदराबादचे असलेले बंडी हे गेल्या ५३ वर्षांपासून शिर्डीत येत आहेत.
ते म्हणाले, साईबाबा माझ्या आयुष्यात मार्गदर्शक ठरले आहेत. म्हणून माझी शेतजमीन विकल्यानंतर मला त्यातील काही भाग बाबांना कृतज्ञता म्हणून द्यायचा होता. आपल्या कुशल कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या बंडीने हिंगोली जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यापूर्वी आयुष्यभर सुतार म्हणून काम केले.
वाढत्या वयामुळे, त्यांना आता आपली जमीन कसता येत नाही, म्हणून त्यांनी ती जमीन विकली आणि त्यातून मिळालेली रक्कम दानासाठी वापरली. नरसिंहरावं म्हणालेत की, साई बाबांनी माझी विनंती पूर्ण केली आणि संस्थेसाठी योगदान देण्याची माझी मनापासून इच्छा होती.
साईबाबांवरील त्यांच्या भक्तीव्यतिरिक्त, नरसिंहराव यांनी यापूर्वी कोपरगाव येथील जनार्दन स्वामी संस्थेलाही देणगी दिली आहे, जी त्यांची अतूट श्रद्धा आणि औदार्य दर्शवते.
जेव्हा बंडी मंदिराच्या आवारात पोहोचलेत तेव्हा त्यांचे सामान्य स्वरूप, विस्कटलेले अन मळलेले कपडे, विस्कटलेले केस त्याच्या विलक्षण भक्तीला खोटे ठरले. त्यांची कहाणी ऐकून मंदिरात आलेला प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्याबाबत सर्वत्र चर्चा झाली.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी बंडी यांचा शाल व साईबाबांची प्रतिमा देऊन गौरव केला. जे कोट्यावधी रुपयांचे दान देतात त्यांचा जसा सन्मान होतो तसाच सन्मान साईबाबा संस्थानच्या माध्यमातून नरसिंहराव यांचाही करण्यात आला.