Shivraj Singh Chauhan : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तिर्थयात्रा घडवून आणत आहेत. मात्र ते रेल्वेने ही यात्रा घडवून आणत आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात एकदा या यात्रेचा लाभ घेता येणार आहे. असे असताना आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे.
त्यांच्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मार्च महिन्यापासून तिर्थ यात्रेसाठी पाठवण्यात येणार आहे. भिंड येथे संत रविदास जयंती आणि चंभल संभागच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.
संत रविदास यांच्या जन्मठिकाणाचा या सरकारी तिर्थक्षेत्र यात्रा योजनेत समावेश केला जाईल. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनाही विमानाने प्रवास करता येणार आहे. यासाठी सरकारकडून खर्च करण्यात येणार आहे. यासाठी आधी पात्रता तपासून नोंदणी करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक सरकारी खर्चातून यादीतील कुठल्याही तिर्थक्षेत्राची यात्रा करु शकतात. मुख्यमंत्री म्हणाले, विकास यात्रा सर्वच वार्डात जाऊन पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
तसेच यावेळी विविध योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला या यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे आता इतर राज्यात देखील अशी योजना लागू करण्याची मागणी केली जाऊ शकते.