Snake News In Marathi : सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस होतोय. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालांचे नुकसान होत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांनी मोसमी पावसाला देखील सुरुवात होणार आहे.
खरंतर दरवर्षी पावसाळ्याच्या काळात सर्पदंशाच्या घटना वाढत असतात. उन्हाळ्यात सुद्धा सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र पावसाळी काळात या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होते.

खरंतर भारतात काय बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या प्रजाती विषारी आहेत. मात्र असे असले तरी देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. एका आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक दरवर्षी सर्पदंशामुळे मरण पावतात.
भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात आणि त्यातील बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहेत मात्र असे असतानाही देशात सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या फारच मोठी असून यामुळे साप दिसला तरी देखील सर्वसामान्यांची तारांबळ उडते. साप दिसला तरी अंगावर काटा उभा राहतो.
देशात आढळणारी किंग कोब्रा, कोब्रा ही सापाची जात सर्वात जास्त विषारी असल्याचे सांगितले जाते. मात्र भारतात अशी ही एक सापाची जात आहे जी कोब्रापेक्षा विषारी आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण नागापेक्षा विषारी सापाची जात देखील आपल्या देशात आढळते आणि आपल्या महाराष्ट्रातही या जातीचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो.
या जातीचा साप आहे नागापेक्षाही विषारी
महाराष्ट्रात आणि देशात नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या चार जाती सर्वाधिक विषारी असल्याचे सांगितले जाते. मात्र या चार पैकी मण्यार ही जात नागापेक्षाही विषारी आहे. जाणकार लोक सांगतात की मण्यारचा मृत्यू रेट हा घोणस, नाग, फुरसे या प्रमुख विषारी जातींपेक्षा सर्वाधिक आहे.
याचे कारण म्हणजे हा साप जेव्हा चावतो तेव्हा व्यक्तीला काहीच जाणवत नाही. डास किंवा मुंगी चावल्यानंतर जसे वाटते तसेच या सापाच्या दंशानंतर वाटते. यामुळे अनेक जणांना साप चावल्याचे जाणवत नाही. याचमुळे या जातीचा मृत्यू रेट हा फारच अधिक आहे. हेच कारण आहे की या जातीच्या सापाला सायलंट किलर असं देखील म्हटलं जातं.
मृत्यूचा धोका अधिक
मण्यार जातीचा साप चावल्यानंतर डास किंवा मच्छर चावल्यासारखे वाटते आणि यामुळे अनेक जणांना आपल्याला साप चावला आहे हेच कळत नाही. यामुळे साप चावल्यानंतरही तो व्यक्ती बेसावध रहातो आणि योग्य वेळी उपचार मिळाला नाही तर अशा व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
हे साप रात्रीच्या वेळी शिकारीला निघतात. हा साप चावल्यानंतर लगेचच त्याच्या विषाचे परिणाम आपल्याला दिसत नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे हे साप हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वाधिक दंश करतात. हा साप चावल्यानंतर त्याचे दाताचे निशाण सुद्धा दिसत नाहीत.
या जातीचा साप चावल्यानंतर उपचाराला उशीर झाला तर मृत्यू होण्याची शक्यता असते, किंवा अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता देखील अधिक असते. हा साप चावल्यानंतर दीड ते दोन तासांच्या आत उपचार मिळणे आवश्यक आहे जर या काळात उपचार मिळाला नाही तर व्यक्तीचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते अशी माहिती जाणकार लोक देतात.