Soybean Rate : सोयाबीनच्या बाजारभावाने आता थेट ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून शेतकरी आणि व्यापारी वर्गात मोठी चर्चा रंगली आहे. येथील अडत बाजारात शनिवारी (ता. २४) असलेला सोयाबीनचा कमाल दर अवघ्या दोन दिवसांत मंगळवारी (ता. २७) तब्बल २०० रुपयांनी वाढून ५७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. या भाववाढीमुळे सोयाबीन बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घडामोडींमुळे शेतकऱ्यांमध्ये संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत. एकीकडे, भाववाढीची आशा सोडून तातडीच्या आर्थिक गरजांमुळे कमी दरात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना आता चुटपूट लागली आहे. तर दुसरीकडे, बाजारात भाववाढ होईल या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवणारे शेतकरी सध्या समाधान व्यक्त करत आहेत.

अतिवृष्टीच्या संकटातून बचावलेल्या सोयाबीनची काढणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला बाजारात ४ हजार ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. आवक वाढूनही अनेक दिवस बाजारभावात फारशी हालचाल दिसून आली नाही.
यामुळे शासनाने यावर्षी १५ नोव्हेंबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू केली. हमीभाव केंद्रांवर ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीची आशा सोडून बाजारात तसेच हमीभाव केंद्रांवर सोयाबीनची विक्री केली.
दरम्यान, हमीभावाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक कमी होऊ लागली. याचा थेट परिणाम बाजारभावांवर झाला असून मागील महिन्यापासून भाववाढीचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या वीस दिवसांपासून सोयाबीनला सातत्याने ५ हजार रुपयांहून अधिक दर मिळत आहे. या काळातही बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमीच राहिली.
याशिवाय, सोयाबीन प्रक्रिया उद्योगांकडूनही बाजारभावापेक्षा जास्त दर देण्यास सुरुवात झाल्याने बाजारात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोयाबीनचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी बाजारात ११ हजार ५०० क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली. यावेळी कमाल दर ५७०० रुपये, किमान ५०७८ रुपये, तर सर्वसाधारण दर ५४०० रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आला. यापूर्वी २४ जानेवारी रोजी १३ हजार ७१ क्विंटल आवक झाली होती.
तेव्हा कमाल दर ५५०० रुपये, किमान ४८३० रुपये, तर सर्वसाधारण दर ५३०० रुपये होता. २२ जानेवारी रोजी १२ हजार ५०० क्विंटल आवक झाली असून कमाल दर ५४१२ रुपये नोंदवण्यात आला होता.
एकूणच, आवक घटणे, उद्योगांची वाढती मागणी आणि बाजारातील स्पर्धा यामुळे सोयाबीनचे दर आगामी काळात आणखी मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













