खुल्या बाजारात सोयाबीन दर ‘एमएसपी’च्या पुढे; ‘नाफेड’ खरेदी केंद्रे बंद, दरवाढीमागची कारणे कोणती?

Published on -

Soybean Rate : जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या दरात झालेल्या वाढीमुळे शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. खासगी बाजारात सोयाबीनचे दर हमीभाव ५३२८ रुपयांपेक्षा जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.

परिणामी जिल्ह्यातील १६ खरेदी केंद्रांवर आवक जवळपास थांबली असून अनेक केंद्रे गुंडाळण्याची वेळ आली आहे.

शासनाने सोयाबीन खरेदी सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवस हमीभावाने खरेदी केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार ही मुदत १२ फेब्रुवारी रोजी संपत आहे. मात्र सुरुवातीच्या काळात नाफेडकडून खरेदीची गती मंद होती.

डीएमओ व व्हीसीएमएफमार्फत शेड्युलिंग प्रक्रिया राबवली जात असली तरी मर्यादित स्लॉट, १२ टक्क्यांच्या आत आर्द्रता अट, एफएक्यू ग्रेडसह इतर निकष यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. आर्थिक गरजेमुळे अनेकांनी कमी दरातच माल विकला.

दरम्यान, गेल्या महिनाभरात खासगी बाजारात सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. ३० जानेवारीला ५१०० ते ५७०० रुपये, २ फेब्रुवारीला ५१०० ते ५५५५ रुपये, ४ फेब्रुवारीला ५१५० ते ५६०० रुपये, ६ फेब्रुवारीला ५१५० ते ५५२० रुपये तर ९ फेब्रुवारीला ५१०० ते ५४७६ रुपये असा दर राहिला.

अनेक बाजार समित्यांमध्ये कमाल दर हमीभावापेक्षा जास्त नोंदवला गेला. शिवाय खासगी व्यापाऱ्यांकडून तत्काळ नगदी पेमेंट मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल त्या दिशेने वाढला आहे.

दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. यंदा पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट झाली. शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी माल शिल्लक नसल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे.

त्याचबरोबर खाद्यतेल उद्योग आणि पशुखाद्य निर्मितीसाठी सोयापेंडची वाढती मागणी, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल व डीओसीच्या दरातील तेजी यांचा एकत्रित परिणाम म्हणून सोयाबीनच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

मात्र, शेतकऱ्यांकडे विक्रीयोग्य माल उरलेला नसल्याने दरवाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाच अधिक प्रमाणात होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe