सोयाबीनच्या भावात जोरदार तेजी; ६ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता

Published on -

Soybean Rate : बाजारातील कमी आवक, रुपयाचे अवमूल्यन, खाद्यतेल आणि सोयापेंडचे वाढलेले दर तसेच निर्यातीसाठी टिकून असलेली मागणी यामुळे सोयाबीनच्या भावात सध्या चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. हमीभावाचा टप्पा पार करत सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ५५०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, येत्या काळात हे दर ६ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

देशात यंदा सोयाबीनचे एकूण उत्पादन घटले आहे. त्यातच मागील हंगामातील शिल्लक साठाही तुलनेने कमी असल्याने दरात सुधारणा अपेक्षित होती. मध्य प्रदेशात भावांतर योजना आणि महाराष्ट्रात हमीभावाने खरेदी योजना राबवण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन थेट सरकारी खरेदीत गेले.

परिणामी खुल्या बाजारात आवक कमी झाली आणि उपलब्धतेवर परिणाम झाला. मागणी मात्र कायम राहिल्याने दर वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले.

जानेवारीच्या मध्यापर्यंत सोयाबीनचे भाव ५ हजारांच्या आसपास होते. त्यानंतर काही काळ बाजार स्थिर राहिला. मात्र आवक कमीच राहिली आणि प्रक्रिया उद्योग तसेच निर्यातीसाठी मागणी टिकून राहिल्याने सध्या भावात पुन्हा तेजी आली आहे.

सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला ५५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून, प्रक्रिया प्लांट्सकडून ५८०० ते ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. मध्य प्रदेशात भावांतर योजनेतून आतापर्यंत सुमारे १७ लाख टनांची खरेदी झाली आहे, तर महाराष्ट्रात हमीभावाने सुमारे ६ लाख टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

अशा प्रकारे दोन्ही राज्यांत मिळून २३ लाख टन सोयाबीन सरकारी योजनांमधून खरेदी झाले आहे. यातील मोठा साठा ‘स्टॉक’मध्ये गेल्याने बाजारातील उपलब्धता आणखी घटली आहे.

दरम्यान, सोयापेंडचा वापरही चांगल्या प्रमाणात सुरू आहे. पोल्ट्री उद्योगाला सध्या चिकन आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने सोयापेंडची मागणी कायम आहे.

सोयापेंडचे भाव वाढले असले तरी निर्यातीसाठी मागणी असल्याचे निर्यातदारांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने खाद्यतेल आयात महाग झाली असून, याचा फायदा अप्रत्यक्षपणे सोयाबीनच्या दरांना मिळत आहे.

एकूणच कमी उत्पादन, सरकारी खरेदीमुळे घटलेली आवक, मजबूत देशांतर्गत वापर आणि निर्यात तसेच रुपयाचे अवमूल्यन या सर्व घटकांमुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळत आहे.

त्यामुळे येत्या काळात बाजारात १०० ते १५० रुपयांचे चढ-उतार होत असले तरी एकूणच भाव ६ हजारांच्या दिशेने वाटचाल करतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe