SPPU News : पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मोठा दणका दिला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात 20 टक्क्यांची वाढ करण्याचे जाहीर केले असून विद्यार्थ्यांना आता वाढीव शुल्क द्यावे लागणार आहे.

यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे. विद्यापीठाने 2018-19 पासून परीक्षा शुल्कात वाढ केलेली नव्हती. पण यावर्षी शुल्क वाढणार हे जवळपास निश्चित होते. त्यानुसार आता विद्यापीठाकडून परीक्षा शुल्कात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
खरंतर विद्यापीठाकडून 55% पर्यंत परीक्षा शुल्क वाढवण्यात येईल अशा चर्चा रंगल्या होत्या. विद्यापीठाला तसाच प्रस्ताव प्राप्त झाला होता. पण विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता परीक्षा शुल्कात कमीत कमी वाढ करण्यात यावी अशी भूमिका घेतली.
यानुसार विद्यापीठाने परीक्षा शुल्कात 20 टक्के वाढ करण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) लागू झाल्यामुळे परीक्षांच्या नियोजन, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रियेत बदल झाले असल्याने ही वाढ करण्यात आली आहे.
शैक्षणिक धोरणात झालेल्या बदलांमुळे परीक्षा शुल्कात वाढ करणे आवश्यक होते, यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वाढवले असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.
नक्कीच जर तुम्हीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण घेत असाल तर तुम्हालाही आता अतिरिक्त परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अधिकचा भार पडणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे पुणे विद्यापीठाने आता परीक्षा शुल्क जमा करण्याची पद्धत सुद्धा पूर्णपणे बदलून टाकली आहे. आधी परीक्षा शुल्क महाविद्यालयात जमा करावे लागत होते.
पण आता परीक्षा शुल्क महाविद्यालयात नव्हे तर थेट विद्यापीठाकडे जमा होणार आहे. विद्यार्थ्यांकडून जमा केले जाणारे परीक्षा शुल्क थेट विद्यापीठाच्या खात्यात जमा होईल.
यामुळे या प्रक्रियेत आणखी पारदर्शकता वाढणार आहे. दरम्यान विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क जमा झाल्यानंतर महाविद्यालयाचा हिस्सा विद्यापीठाकडून दोन दिवसांच्या आत जमा करण्यात येणार आहे.