ST Bus Service : महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा अध्यात्मिक साधनेचा काळ म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे बंद असतो आणि या महिन्यात अनेकजण भगवान शंकराच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर, उज्जैन, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर, परळी वैजनाथ, श्रीशैलम यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर भेटी देतात.
दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या श्रावण महिन्यात एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाणार असाल तर तुमच्यासाठी एसटी महामंडळाने एक गुड न्यूज दिली आहे. विशेषता ज्यांना आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शनाला जायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

कारण की श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून एक विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर ते श्रीशैलमदरम्यान नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
कशी आहे विशेष बस सेवा?
महाराष्ट्रातून आंध्रप्रदेशातील श्रीशैलम ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या शिवभक्तांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. विशेषता श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. यामुळेच एसटी महामंडळाने सोलापूर ते श्रीशैलम यादरम्यान विशेष बस सेवा सुरू केली आहे.
या बससेवेबाबत बोलायचं झालं तर सोलापूर येथून दररोज सकाळी सहा वाजता एसटी महामंडळाची बस सोडली जाणार आहे आणि रात्री आठ वाजता ही बस मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग अर्थात श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे पोहोचणार आहे.
तिकीट दर कसे असणार?
या विशेष बसने प्रवास करणाऱ्या शिवभक्तांना राज्य सरकारच्या विविध सवलतीच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. सामान्य प्रवाशांसाठी या बसचे तिकीट दर 779 रुपये इतके असेल. तसेच महिलांसाठी 693 रुपये इतके दर राहणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र बाउंड्री पर्यंत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे आणि त्यापुढील प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना 597 रुपये इतके तिकीट लागणार अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
एवढेच नाही तर जे शिवभक्त अग्रीम तिकीट बुक करतील त्यांना 15 टक्क्यांची तिकीट सवलतही मिळणार आहे. ज्या लोकांना समूहाने प्रवास करायचा असेल त्यांनी सोलापूर आगाराशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
एकंदरीत एसटी महामंडळाच्या सोलापूर आगारातून सुरू झालेली ही बस सेवा श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी फायद्याची ठरणार असून यामुळे राज्यातील शिवभक्तांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.