ST Employee Strike Latest Update : काल बैलपोळ्याचा सण साजरा झाला आहे. बैलपोळ्याच्या सणाला श्रावण महिन्याची सांगता होत असते. त्यानुसार काल श्रावण महिन्याची सांगता झाली आहे. श्रावण महिन्यानंतर आता पहिला मोठा सण येतो तो गणेशोत्सवाचा.
गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कोकणातील जे नागरिक मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कामाला गेले आहेत ते नागरिक आता गणेशोत्सवाच्या सणानिमित्त आपल्या मूळ गावी परतणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळावा…
मुंबई, पुण्यातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रेल्वेगाड्या आणि एसटी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, असे असतानाच मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा
महत्त्वाचे म्हणजे या संपाला आज सुरुवात देखील झाली आहे. गणेशोत्सवाचा सण अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपला असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोणत्या ठिकाणी कडकडीत संप ?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात चालक, वाहक आणि वर्कशॉप मधील कर्मचारी सहभागी झाले असून यामुळे राज्यातील अनेक भागांमधील एसटी वाहतूक सेवा कोलमडली आहे. या संपामुळे एसटी प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या भागात संप सुरू असतानाही एसटी बसेस धावत आहेत आणि कोणत्या ठिकाणी कडकडीत संप सुरू आहे याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
251 आगारांपैकी 35 आगार पूर्णपणे बंद
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णपणे बंद आहेत. मात्र राज्यातील उर्वरित आगार अंशतः किंवा पूर्णतः सुरू आहेत. मुंबई विभागाबाबत बोलायचं झालं तर येथील सर्व आगारातील एसटी वाहतूक सुरळीत सुरू आहे.
पण ठाणे विभागातील कल्याण आणि विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहे. विदर्भात संपाचा कोणताच परिणाम पाहायला मिळत नाही. तेथील जवळपास सर्वच आगारांमधून एसटी वाहतूक सुरू आहे. पण अकोला अन अमरावती जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
लातूर आणि नांदेड विभागातील बहुतांशी आगार बंद
मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागातील बहुतांशी आगार बंद आहेत. उत्तर महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर डेपो मधून धावणाऱ्या बसेस अजूनही डेपोतच उभ्या आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.
शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद
पश्चिम महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर येथील कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. पण, पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. मिरज आणि सातारा बसस्थानकातून दहा टक्के बसेस सुरू आहेत.
स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व बसेस बंद
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व बसेस आज बंद आहेत, परंतु ज्या बसेस रात्री मुक्कामी होत्या त्या सोडल्या जाणार आहेत. एकंदरीत राज्यातील विविध भागांमध्ये संपाला सुरुवात झाली असून राज्य सरकारने जर या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर या संपाचे लोण संपूर्ण राज्यभर पसरणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांचे मोठे हाल होणार आहेत.