State Employee DA Hike : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे.
एकीकडे राज्य शासनाने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला आहे तर दुसरीकडे पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 12 टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढीमुळे 53 टक्क्यांवर पोहोचला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असला तरी देखील प्रत्यक्षात ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे आणि या कर्मचाऱ्यांना जुलै ते जानेवारी या महिन्यांमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.
तसेच महाराष्ट्र सरकारने मंगळवारी 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या 5 व्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित वेतनश्रेणी अंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 टक्क्यांनी वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. याचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आहे.
या जीआर म्हणजेच शासन निर्णयानुसार पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 443 टक्क्यांवरून 455 टक्के करण्यात आला आहे.
1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या थकबाकीसह हा आर्थिक लाभ फेब्रुवारी 2025 च्या पगारासह रोखीने दिले जाईल. फेब्रुवारीच्या पगारांसोबत म्हणजेच मार्च महिन्यात जो पगार कर्मचाऱ्यांना मिळेल त्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल.
पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा येत्या काही दिवसात आणखी तीन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे.
होळीच्या आधी याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 56% एवढा होणार आहे आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. एकंदरीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2025 हे वर्ष विशेष खास ठरत आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे तर दुसरीकडे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जात आहे.