महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुन्हा लांबणीवर, केव्हा होणार 3% DA वाढीचा निर्णय?

State Employee DA Hike News : ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के केला. तसेच ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली.

महत्त्वाची बाब अशी की, जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच हा भत्ता 56% एवढा होणार आहे. याबाबतचा निर्णय हा मार्च 2025 मध्ये होळी सणाच्या आधीच घेतला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.

मात्र, राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही 50% दरानेच महागाई भत्ता मिळत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांनाही जुलै 2024 पासून 53 टक्के महागाई भत्ता लागू करणे अपेक्षित आहे. मध्यंतरी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो असे बोलले जात होते.

एवढेच नाही तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला असून मुख्यमंत्री महोदय लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेतील आणि याला हिरवा कंदील दाखवतील असे म्हटले जात होते.

मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा लांबणीवर पडणार असे दिसत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 03 टक्के महागाई भत्ता परत लांबणीवर गेला आहे, कारण निधी वितरणांमध्ये डीए साठी तरतुद करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, महीना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यांमध्ये राज्य कर्मचारी / तसेच पेन्शन धारकांना वाढीव डी.ए करीता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्तासाठी वाट पाहावी लागणार आहे.

जानेवारी महिन्यात याबाबतचा निर्णय होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटपासाठी सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याने सध्या निधी शिल्लक नाहीये.

म्हणून आता राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्तासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे.