State Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी एस टी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आंदोलनाचा बडगा उभारला जाईल असं सांगितले होते. दरम्यान आता महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी देखील संपावर जाणार आहेत. गेल्या पाच ते साडेपाच वर्षांपासून मानधनात वाढ होत नसल्याने अंगणवाडी कर्मचारीका संपावर जाणार आहेत.
खरं पाहता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. अशा परिस्थितीत राज्य शासनाने साडे पाच वर्षांपूर्वी मानधन वाढवले होते तर केंद्र शासनाने मानधन वाढवून जवळपास साडेचार वर्षाचा काळ लोटला आहे. यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून वारंवार शासनाकडे मानधन वाढवण्यासाठी निवेदने दिली जात आहेत.
मात्र शासन यावर गंभीर नसून मानधनात वाढ होत नसल्याने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्धार केला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे मात्र तरीदेखील पगारात वाढ होत नसल्याने अंगणवाडी कर्मचारी हताश झाले आहेत. इतक्याशा मानधनामध्ये कसं घर चालवायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढ्यात उभा झाला आहे.विशेष म्हणजे कोरोना काळात कोरोनायोद्धा म्हणून कर्तव्य बजावले. तरीही या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घातले नाही असा आरोप देखील कर्मचारी करत आहेत.
या मागण्यासाठी वारंवार शासन दरबारी निवेदने देण्यात आली मात्र मानधन वाढ सहित इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. परिणामी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 20 फेब्रुवारी 2023 पासून काम बंद आंदोलन करत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे समितीने याबाबत एक निवेदन देखील दिले आहे या सदर निवेदनात मानधनात वाढ नाही, सेवा समाप्तीचा लाभ नाही, आजारपणात रजा नाहीत, उन्हाळ्यात सुट्ट्या नाहीत, विशेष म्हणजे नवीन मोबाईल देखील शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, यामुळे आता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. निश्चितच या संपामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतात का याकडे विशेष लक्ष राहणार आहे.