State Employee News : गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी महामंडळाला शासनात विलीन केले जावे अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. हा कर्मचाऱ्यांचा संप महामंडळाला चांगलाच दुःखदायी ठरला होता.st
जवळपास चार महिने पूर्णपणे महामंडळाचे कामकाज ठप्प होते. यामुळे महामंडळाची आर्थिक हानी झाली होती. त्यावेळी हा संप मान्य न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सरकारला थांबवता आला. निश्चितच या संपामूळे कर्मचाऱ्यांची महामंडळ शासनात विलीनीकरण करण्याची मागणी पूर्ण झाली नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली होती.
दरम्यान आता महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी महामंडळाविरुद्ध आपल्या काही मागणीसाठी आंदोलनावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महामंडळातील निवृत्त कर्मचारी २०१९ पासूनची येणे असलेली रक्कम मिळावी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलनावर जाणार आहेत. ३० जानेवारीपासून पूर्व विदर्भात हे आंदोलन होणार असून त्याची घोषणा करण्यात आली आहे.
पूर्व विदर्भातील सर्व एसटीच्या विभागीय कार्यालयावर हे आंदोलन होणार आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या महामंडळाने पूर्ण न केल्यास दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी माहिती दिली आहे.
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
२०१९ मध्ये निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून येणे असलेली रक्कम अद्यापही मिळाली नाही. विशेष म्हणजे हे सेवानिवृत्त कर्मचारी वारंवार एसटीच्या कार्यालयात चकरा मारत असून त्यांना समाधानकारक उत्तर देखील मिळत नाही. यामुळे महामंडळाने तातडीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ही रक्कम व्याजासहित वर्ग करावी.
याशिवाय एसटी महामंडळातील सेवेवर असतांना दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह कुटुंबालाही सहा महिन्यांचा मोफत पास दिला जावा, यासाठी वयाची अट नसावी.
याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अजून एक मोठी मागणी आहे ती म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अतिशय अल्पशी पेन्शन मिळते. त्यामुळे एसटीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक योग्यता व पात्रता बघून एसटीच्या सेवेत ५ टक्के आरक्षण निश्चित करून सेवेवर घेतले जावे.
मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन होणार
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या महामंडळाने सोडवल्या नाहीत तर या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाणार आहे. मागण्या जर महामंडळाने वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्रचे प्रादेशिक सचिव व महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी यावेळी दिला आहे. यामुळे आता महामंडळ याबाबत कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.