Success Story |UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, पण यशस्वी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असते. ही परीक्षा देणारे विद्यार्थी हे टॉपरच असतात, असा समज असतो. मात्र, IAS अधिकारी रुक्मिणी रियार यांची कथा या साच्यात बसणारी नाही. शाळेत सहावीत नापास झालेल्या रुक्मिणीने कोणतेही कोचिंग न घेता पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि थेट दुसरा क्रमांक पटकावला.
रुक्मिणी रियार-
रुक्मिणी रियार यांचा जन्म 1987 मध्ये पंजाबच्या गुरुदासपूर येथे झाला. लहानपणापासून ती सरासरी विद्यार्थिनी होती. सहाव्या वर्गात ती नापास झाली होती. मात्र या अपयशाने ती खचली नाही. पुढे तिने डलहौसी येथील सेक्रेड हार्ट स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर अमृतसरच्या Guru Nanak Dev Universityमधून पदवी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर रुक्मिणीने म्हैसूरमधील (Ashodaya) आणि मुंबईतील Annapurna Mahila Mandal या एनजीओंमध्ये इंटर्नशिप केली. सामाजिक काम करत असतानाच तिने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये रुक्मिणीने पहिल्यांदाच UPSC परीक्षा दिली आणि तिच्या आत्मविश्वास व परिश्रमाच्या जोरावर तिने थेट दुसरा क्रमांक मिळवत देशभरात नाव कमावलं.
कोचिंगशिवाय मिळवलं यश-
रुक्मिणीने कोणतेही कोचिंग घेतले नाही. तिची तयारी पूर्णपणे स्व-अभ्यासावर आधारित होती. ती नियमितपणे NCERT ची 6 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके वाचायची. दररोज वर्तमानपत्रे व मासिकांचा अभ्यास करत होती. याशिवाय अनेक मॉक टेस्ट दिल्या आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवून आपल्या चुका सुधारल्या.
IAS रुक्मिणी रियार यांची यशोगाथा ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणा आहे. शाळेत अपयश आल्यावरही खचून न जाता, चिकाटीने मेहनत घेतल्यास यशाच्या शिखरावर पोहोचता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले.