Sun Pharma Advanced Research Share Price : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत.
सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनी (SPARC) चे शेअर्स सुद्धा सध्या दबावात पाहायला मिळत आहेत. NSE वर या कंपनीचे स्टॉक आता 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर खाली आले आहेत.

सध्या या कंपनीचा स्टॉक एनएसईवर 128.35 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत असून गेल्या नऊ दिवसांपासून यामध्ये सतत घसरण होत असून यामुळे सध्या शेअर होल्डर्स मध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, याच स्टॉक संदर्भात आता एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.
आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक 6.3 टक्क्यांनी घसरलेत. सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च स्टॉक 2025 मध्ये आतापर्यंत 35.2% घसरला आहे. या कंपनीच्या मार्केट कॅपिटल बाबत बोलायचं झालं तर सध्या कंपनीचे मार्केट कॅप 4219 कोटी आहे.
काय आहे नवीन अपडेट
सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनीबाबत नुकतेच एक मोठे अपडेट समोर आले आहे यानुसार रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनीमधील तिची हिस्सेदारी कमी केली आहे.
झुनझुनवाला यांची सप्टेंबरच्या तिमाहीत एकूण हिस्सेदारी 1.9% इतकी होती पण डिसेंबरच्या तिमाहीत ही हिस्सेदारी 1.6% पर्यंत खाली आली आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल गेल्या 9 दिवसांत 970 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे या काळात या कंपनीचे स्टॉक 19 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये केवळ 76 कोटींचा महसूल नोंदवला होता, तर वर्षभरात तिचा निव्वळ तोटा 387 कोटी राहिला.उल्लेखनीय म्हणजे, कंपनी गेल्या सलग आठ वर्षांपासून तोट्यात आहे, ज्याचा संचित तोटा FY24 अखेरीस 1,979 कोटींवर पोहोचला आहे.
तथापि, सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनीचा निव्वळ तोटा डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत 79.5 कोटी इतका कमी झालाय, मागील वर्षी याच तिमाहीत या कंपनीचा तोटा 99.6 कोटी होता.
या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 7.6% वाढ होऊन ती 15 कोटींवर पोहोचली आहे. यामुळे आता या कंपनीची पुढील कामगिरी कशी राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.