नाशिक ते अक्कलकोट दरम्यान तयार केला जाणारा महामार्ग BOT तत्त्वावर बांधला जाणार ! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Published on -

Surat Chennai Expressway : राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. दिल्ली मुंबई महामार्गानंतर देशातील सर्वाधिक मोठा महामार्ग अर्थातच सुरत चेन्नई महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार असून यात महामार्ग प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आला आहे.

खरेतर केंद्र सरकारने भारतमाला प्रकल्प रद्द केल्यानंतर सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प बरेच दिवस रखड्याला आणि यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेत.

मात्र आता हा प्रकल्प पुन्हा गतीमान होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा आता बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांधवापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारला जाणार आहे.

या महामार्गाचा नाशिक ते अक्कलकोट (२२२ किमी) टप्पा आता बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाची सुरुवात नोव्हेंबर २०२६ पासून होईल, अशी माहिती समोर येत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या जड वाहनांमुळे मुंबई व पुणे शहरांवर वाढणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरत–चेन्नई हा वेगवान मालवाहतूक मार्ग जाहीर केला होता.

मात्र, ज्यातून या मार्गाची अंमलबजावणी होणार होती त्या भारतमाला योजनेतील खर्च प्रचंड वाढल्याने अर्थ मंत्रालयाने निधी उपलब्ध करून देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रातील टप्प्यावर प्रक्रिया थांबली होती.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात या प्रकल्पाचे काम सुरू असताना महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाशी संबंधित अडथळ्यांमुळे काम रखडले होते.

आता महामार्गाला टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्रातील २२२ किमी लांबीच्या नाशिक–अक्कलकोट टप्प्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा टप्पा सोलापूर विभागाकडे सोपवण्यात आला आहे.

सोलापूर व अक्कलकोट परिसरात भूसंपादन मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून, अक्कलकोट तालुक्यातील काही भाग वगळता ७० टक्क्यांहून अधिक जमीन संपादन पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित जमीनधारकांना मोबदल्याचे वितरण देखील बहुतेक प्रमाणात पूर्ण झाले आहे. मात्र, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याचे प्रकल्पातील सूत्रांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी सांगितले की, “नाशिक–अक्कलकोट टप्प्याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मार्च २०२६ पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.”

सोलापूर शहरासाठी प्रस्तावित बाह्यवळण मार्गाबाबत निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतमाला योजनेच्या बंदीनंतर प्रकल्पाला झळ बसली असली तरी बीओटी मॉडेलमुळे हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग मार्गी लागण्याची शक्यता आता वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News