टाटा SUVचा जलवा कायम; जानेवारी 2026 मध्ये 70,222 गाड्यांची विक्री, नेक्सॉन-पंच आघाडीवर

Published on -

Tata SUV Cars : भारतात SUV सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा दबदबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जानेवारी 2026 हा महिना टाटासाठी विक्रमी ठरला असून कंपनीने तब्बल 70,222 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे.

गेल्या वर्षी जानेवारीत हा आकडा 48,075 इतका होता. यावर्षी तब्बल 46 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवून टाटाने बाजारात आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, या विक्रीत SUV मॉडेल्सचा मोठा वाटा आहे.

टाटा नेक्सॉनने पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेलचा मान पटकावला. जानेवारी महिन्यात नेक्सॉनच्या 23,365 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 52 टक्क्यांनी अधिक आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा विविध ड्राइव्हट्रेन पर्यायांमुळे नेक्सॉनला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

टाटा पंचही विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. नुकतेच फेसलिफ्ट मॉडेल लाँच झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जानेवारीत पंचच्या 19,257 युनिट्स विकल्या गेल्या, ज्यात 19 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. आकर्षक डिझाइन आणि परवडणारी किंमत हे पंचचे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे.

दरम्यान, आयकॉनिक सिएराने पुनरागमन करताच धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच महिन्यात सिएराच्या 7,003 युनिट्सची विक्री झाली. पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह आलेली ही मध्यम आकाराची SUV आपल्या स्टायलिश डिझाइन आणि सेगमेंट-फर्स्ट फीचर्समुळे ग्राहकांना भुरळ घालत आहे.

हॅरियर आणि सफारी या प्रीमियम SUV ची मागणीही वाढली आहे. हॅरियरच्या विक्रीत 149 टक्क्यांची वाढ होऊन 3,711 युनिट्स विकल्या गेल्या. नव्या पेट्रोल इंजिन पर्यायामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे. सफारीच्या 2,375 युनिट्सची विक्री झाली असून 53 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

एकूणच, विविध ड्राइव्हट्रेन पर्याय, आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइन यांच्या जोरावर टाटा मोटर्सने SUV बाजारात आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे. आगामी महिन्यांतही हा वेग कायम राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News