Teacher Recruitment : खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि वैयक्तिक मान्यता प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कठोर पावले उचलली आहेत.
बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती (मिसरिप्रेझेंटेशन) किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर आता थेट दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे नियमभंग करणाऱ्या व्यवस्थापनांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

शासनाच्या २०१२, २०१७ आणि २०२२ मधील शासन निर्णयांनुसार नियुक्ती व मान्यता प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना लागू आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रकरणांत या नियमांची पायमल्ली होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
विशेष म्हणजे, नियुक्ती प्रक्रियेत मूळ गैरव्यवहार शाळा व्यवस्थापनांकडून होत असतानाही, आतापर्यंत कारवाई प्रामुख्याने संबंधित कर्मचारी किंवा काही विभागीय अधिकाऱ्यांपुरतीच मर्यादित राहिल्याचे शासनाने नमूद केले आहे.
यामुळे शासन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा ठपका ठेवत, आता दोषी व्यवस्थापनांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापुढे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देताना केवळ कागदोपत्री पूर्ततेवर समाधान न मानता प्रत्यक्ष तपासणी करणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. वैयक्तिक मान्यतेसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा सादर करणे हा थेट दखलपात्र गुन्हा मानला जाणार आहे.
मान्यता प्रक्रियेत तीन स्तरांवर काटेकोर पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश, प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल यासह सर्व प्रशासकीय नोंदी तपासल्या जाणार आहेत.
तसेच शाळेचा प्रत्यक्ष हजेरीपट, संस्थेच्या आणि कार्यालयाच्या ‘आवक-जावक’ नोंदवहीतील नोंदींची पुनःपडताळणी केली जाणार आहे. भरती प्रक्रिया संबंधित कालावधीत लागू असलेल्या शासन आदेशांनुसार आणि नियमांनुसारच झाली आहे का, याची खात्री करणेही सक्षम प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात आले असून, आतापर्यंत अन्यायकारक कारवाईला सामोरे जावे लागलेल्या अनेक शिक्षकांना यामुळे दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार, बनावट मान्यतांचे प्रकार आणि व्यवस्थापनांची मनमानी यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.













