जेव्हा भारतीय कुटुंब आपल्या पहिल्या कारचा विचार करतं, तेव्हा मनात एकच गोष्ट असते विश्वासार्हता, आराम आणि कमी किंमत. आणि अशा वेळी जर ७ लोक बसणारी गाडी तीही स्वस्त दरात मिळाली, तर विचारायलाच नको! असंच काहीसं घडलंय मारुती सुझुकीच्या ‘इको’ या युटिलिटी व्हॅनसह. मे महिन्यात या गाडीने विक्रीचे नवे उच्चांक गाठले तब्बल १२,३२७ कुटुंबांनी ही गाडी निवडली, कुठलाही गाजावाजा न करता, शांतपणे आणि खात्रीने.
ही गाडी देशातील सर्वात परवडणारी ७-सीटर म्हणून ओळखली जाते. ५.७० लाख रुपये ही तिची सुरुवातीची किंमत असून, ५, ६ आणि ७ सीट्सच्या फॉरमॅटमध्ये ती उपलब्ध आहे. त्यामुळे लहान-मोठ्या कुटुंबासाठी ही एक परिपूर्ण निवड ठरते.

मारुती सुझुकी भारतातली नंबर-१ वाहन उत्पादक कंपनी आहे, हे पुन्हा एकदा याच महिन्यात सिद्ध झालं. मे २०२५ मध्ये त्यांनी एकूण १.८० लाख वाहनांची विक्री केली, गेल्या वर्षी याच महिन्यात झालेल्या विक्रीच्या तुलनेत सुमारे ३ टक्क्यांची वाढ. या वाढीचा मोठा वाटा ‘इको’ने उचलला. दर महिन्याला तिची विक्री स्थिरपणे वाढतेय, आणि मे महिन्यात तर गेल्या सात महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली गेली.
गेल्या काही महिन्यांचा मागोवा घेतला, तर इकोची प्रगती स्पष्ट दिसून येते नोव्हेंबरमध्ये १०,५८९ युनिट्स विकल्या गेल्या, डिसेंबरमध्ये ११,६७८, जानेवारीत ११,२५०, तर एप्रिलमध्येही ११,४३८ युनिट्सची विक्री झाली. पण मेमध्ये हे सगळे आकडे मागे टाकत १२,३२७ पर्यंत पोहोचले.
इकोच्या नव्या मॉडेलमध्येही अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन के-सिरीज १.२ लिटर इंजिन आता अधिक ताकद देतं. पेट्रोल व्हर्जन ८०.७६ पीएस पॉवर देतो, तर सीएनजीवर ही शक्ती ७१.६५ पीएसपर्यंत जाते. मायलेजबाबतही ही गाडी आश्वासक आहे पेट्रोल ट्रिम २०.२ किमी प्रति लिटरचा दावा करते, तर सीएनजी ट्रिम २७.०५ किमी प्रति किलोचा.
सुरक्षिततेकडेही मारुतीने लक्ष दिलं आहे. इकोमध्ये ११ महत्त्वाची सुरक्षा फीचर्स आहेत – ज्यात रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, इंजिन इमोबिलायझर, चाइल्ड लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर, एबीएस व ईबीडीसह सहा एअरबॅग्सचा समावेश आहे. इंटिरिअरमध्येही ताजेपणा आला आहे नवीन स्टिअरिंग व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि रोटरी एसी कंट्रोल्स यामुळे आता ती अधिक आधुनिक भासते.