India Hydrogen Train : भारतात पहिल्यांदाच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनची चाचणी सुरू झाली असून, यामुळे पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं गेलं आहे. जिंद ते सोनीपत या हरियाणातील ८९ किमी मार्गावर ही ट्रेन सध्या चाचणीवर आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या ट्रेनचं उत्पादन करण्यात आलं आहे.
भारताची पाचव्या देशाच्या यादीत एन्ट्री
जगात आजपर्यंत केवळ चारच देशांमध्ये (जर्मनी, चीन, फ्रान्स आणि अमेरिका) हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन उपलब्ध आहेत. आता भारत या यादीत पाचवा देश ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतात तयार झालेली ट्रेन इतर देशांच्या तुलनेत अधिक शक्तिशाली असून, ती १२०० एचपी इतकी ताकद निर्माण करते.

प्रवासी क्षमता आणि वेगाचा आवाका
ही ट्रेन एका वेळेस २६३८ प्रवाशांना नेण्यास सक्षम आहे आणि तिचा कमाल वेग ११० किमी प्रतितास आहे. ८ कोच असलेली ही ट्रेन हायड्रोजनवर चालणाऱ्या जगातील सर्वात लांब ट्रेन असेल. भारत सरकारच्या या उपक्रमामुळे देशांतर्गत प्रवासात क्रांती घडण्याची शक्यता आहे.
हायड्रोजन तंत्रज्ञानाचे कार्यप्रणाली
हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल वापरला जातो. या सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेमुळे वीज निर्माण होते आणि त्यातून ट्रेनला गती मिळते. या प्रक्रियेमध्ये फक्त पाणी तयार होत असल्याने ही ट्रेन पर्यावरणासाठी अत्यंत अनुकूल आणि प्रदूषणमुक्त आहे.
सरकारी योजना आणि भांडवली गुंतवणूक
केंद्र सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात हायड्रोजन ट्रेनसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याशिवाय पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ६०० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण ३५ हायड्रोजन ट्रेन तयार करून त्या देशभरात विविध मार्गांवर कार्यान्वित केल्या जाणार आहेत.
पर्यावरणपूरक भविष्याची दिशा
हायड्रोजन ट्रेनमुळे केवळ इंधनाची बचत होणार नाही, तर देशाच्या हरित विकासाला गती मिळेल. ही ट्रेन भारतात स्वच्छ, शाश्वत आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञानासाठीची नवीन दिशा ठरेल. त्यामुळे वंदे भारतनंतर आता भारताला हायड्रोजन ट्रेनचाही अभिमान वाटणार आहे.