सोन्याची लकाकी वाढतच जाणार…! १० ग्राम सोन्याचा भाव ७० हजारांच्या समीप

Published on -

Gold price : ऐन लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असतानाच गेल्या काही दिवसांपासून सोने भाव खायला लागले आहे. सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा १० ग्रामचा भाव ७० हजारांच्या समीप म्हणजे ६९,६३० रुपयांवर गेला.

सोने दराच्या या नव्या उच्चांकामुळे लग्नाच्या हंगामात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्यांच्या खर्चात मोठी वाढ होऊन बजेट कोलमडून पडले आहे. जागतिक पातळीवरील भौगोलिक – राजकीय तणाव लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीचे प्रमाण वाढवले आहे.

याचा परिणाम सोन्याच्या किमतीमध्ये अनपेक्षित वाढ होण्यावर झाला आहे. पिवळ्या मौल्यवान धातूच्या किमतीमधील हा चढता कल असाच आणखी कायम राहण्याचा अंदाज सराफ बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

या भाववाढी मागचे कारण सांगताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, जगाच्या विविध भागांतील भौगोलिक-राजकीय तणाव, युक्रेन-रशिया संघर्ष या सर्व अनिश्चिततेच्या वातावरणात सोन्याचे भाव अपेक्षित नसलेल्या वेगाने वाढत आहेत.

त्यामुळे चीन तसेच रशियासह इतर मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. सर्व स्तरांतून सोन्यातील गुंतवणुकीची मागणी वाढली आहे.

महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने वर्षातून तीनदा व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत.फेडरल रिझर्व्ह जेव्हा व्याजदर कमी करते त्यावेळी सोन्याच्या किमती वाढतात. हे सर्व घटक सोन्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरले असल्याचे गाडगीळ म्हणाले आहेत.

सध्या सोन्याची मागणी मजबूत आहे. लग्नसराईच्या हंगामाचा विचार करता ग्राहक सोने खरेदीचे आपले बजेट कमी करतील, असा अंदाज आहे. सध्या सोन्याच्या किमतीचा वाढीव कल असाच कायम राहणार आहे.

या तेजीमुळे किमती आणखी कोणत्या साध्य पातळीला जातील हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही गाडगीळ यांनी सांगितले.

ग्राहकांनी काय करावे

ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, किमतीत घट होत असताना सोने खरेदी करावे, केवळ दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करावी, सट्टा आणि बाजारातील अफवा टाळावेत, असे मी सुचवेन. सोने ही मूलभूतपणे एक मजबूत आणि विश्वासार्ह मालमत्ता आहे आणि एखाद्याने दीर्घकालीन गुंतवणूक करत राहणे आवश्यक आहे, असेही गाडगीळ यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe