Pune News : गेल्या काही महिन्यापासून पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रशासन सज्ज झाले असून नवीन आदेश काढण्यात आले आहेत. नवले ब्रिजवर झालेला भीषण अपघात फारच वेदनादायी ठरला आहे. दरम्यान आता याच अपघाताच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. आता शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकावर दंड आकारावा, तर तीनपेक्षा अधिक वेळा नियमभंग केल्यास संबंधिताचा वाहनचालक परवाना रद्द करून त्यानंतरही उल्लंघन केल्यास वाहन जप्त करण्याची कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील वाहतूक सुधारणा व अपघात नियंत्रणाबाबत विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची कारणमीमांसा संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी, तसेच या मार्गावरील अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. सेव्ह लाइफ फाउंडेशनने शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे, अपघात बहुल रस्ते आणि रस्त्यांच्या रचनेतील त्रुटींवर अभ्यास करून सुधारणा सुचवण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आली. त्यानुसार शासकीय यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही आयुक्तांनी सांगितले. पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
तोपर्यंत संबंधित रस्त्यांवर तात्पुरते ट्रॅफिक वार्डन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर सोपवण्यात आली आहे. गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर नवले पुल मार्गाचा पुनः अभ्यास करण्याचे काम सेव्ह लाइफ फाउंडेशनला देण्यात येणार आहे. बैठकीस पालिका आयुक्त नवल किशोर राम, प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएल अध्यक्ष पंकज देवरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, एनएचएआय प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यांची स्थिती नियमित तपासण्याचे, रस्ते सुस्थितीत नसल्यास संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याचे आणि दरमहा रस्ता सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.













