Ajab Gajab News : जगामध्ये अशी एक जागा आहे की, त्यावर अद्याप कोणत्याही देशाचा हक्क नाही. वाचून आश्चर्य वाटले ना! पण हे खरं आहे. बीर ताविल ही इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर २,०६० वर्ग कि.मी. क्षेत्रफळाइतकी जागा आहे.
निर्जन आणि नापीक असल्यामुळे जगातील एकाही देशाने या जागेवर कब्जा केलेला नाही, हे विशेष. नाहीतर जमिनीवरील कब्जा कोणाचा या मुद्द्यावरून अनेक देशांमध्ये आजही टोकाचे संघर्ष असल्याचे आपण पाहत आहोतच.
पृथ्वीतलावर अनेक महाद्वीप होते की, ज्यांची अनेक देशांमध्ये विभागणी करण्यात आले. जमिनीचे तुकडे तुकडे पाडून प्रत्येक देशांनी आपापल्या सीमारेषा निश्चित केल्या. पण बीर ताविल हे एकमेव असे ठिकाण आहे की, त्या भूभागाला मालकच नाही.
त्यामुळे या जागेवर आपलाच मालकी हक्क सांगून कोणीही येथील स्वयंघोषित पंतप्रधान होऊ शकतो, असे गमतीने म्हटले जाते. उंच-उंच डोंगर आणि दऱ्यांनी वेढलेल्या या ठिकाणी जगण्यासाठी आवश्यक असलेले वातावरणच नाही.
त्यामुळे या ठिकाणी कोणीही जात नसल्याने मानवी अधिवासच नाही. नकाशावरून ही जमीन आपलीच असल्याचे अनेकांकडून दावे केले जातात, पण याला अधिकृत पुरावा नाही. २०१४ मध्ये अमेरिकास्थित ‘जेरेमिया हिटन’ने या जागेवर एक झेंडा रोवून मालकी हक्क सांगितला होता.
यानंतर या जागेचे ‘किंगडम ऑफ नॉर्थ सुदान’ असे नामकरणही करण्यात आले होते. पण आंतरराष्ट्रीय कायद्यान्वये ही जागा अद्यापही स्वतंत्र असून या भूभागाला मालकच नाही, असे म्हटले तर वावगे होणार नाही.