व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर त्याकरिता अगोदर तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते व त्यासोबत त्या व्यवसायाला असलेली मागणी ही खूप महत्त्वाची असते. मागणीला हेरून आणि तिचा व्यवस्थित अभ्यास करून जर तुम्ही तुमच्या व्यवसायाची उभारणी आणि आखणी केली तर अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून सुरू केलेला व्यवसाय तुम्हाला लाखोत नफा मिळवून देण्याची क्षमता ठेवतो. म्हणून काही लाखो रुपये टाकून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्याची काहीही गरज नसते.
जर आपण कमीत कमी भांडवलात किंवा एक ते पाच लाखाच्या आत भांडवलामध्ये सुरू करता येतील असे व्यवसाय पाहिले तर ती एक भलीमोठी यादी तयार होते. यामधून तुम्ही गरज आणि मागणी ओळखून व्यवसाय निवडणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये असा एक व्यवसाय पाहणार आहोत जो तुम्ही दोन ते तीन लाख रुपयांच्या भांडवलात सुरू करू शकतात व हळूहळू व्यवसायात वाढ करून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकतात.

पेपर कप – पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय देईल तुम्हाला आर्थिक समृद्धी
सध्या मोठ्या प्रमाणावर डिस्पोजेबल केटरिंग उत्पादनांची मागणी शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील वाढतांना आपल्याला दिसून येत आहे व यामध्ये पेपर कप आणि पेपर प्लेट्सला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हा व्यवसाय किंवा पेपर कप किंवा पेपर प्लेट तयार करण्यासाठी ऑटोमॅटिक मशीन सध्या बाजारात मिळतात व हे दोन ते तीन लाख रुपयाचे मशीन घेऊन तुम्ही हा व्यवसाय आरामात सुरू करू शकतात. त्यानंतर तुम्हाला कच्च्या मालाची आवश्यकता लागते व हा कच्चामाल खरेदी केला की तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू शकता. जर आपण उत्पादन सुरू केले व त्यानंतर त्याची चांगली मार्केटिंग केली तर हा व्यवसाय वाढायला वेळ लागत नाही. फक्त मार्केटिंग केल्यामुळे अधिक विक्रेत्यांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचते.
जर आपण थर्माकोल प्लेटचा विचार केला तर एक किलो कच्च्या मालापासून 300 थर्माकोल प्लेट तयार होतात व एक किलो थर्माकोलचे साहित्य तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये किलो या दराने मिळते. यामध्ये तुम्ही शंभर प्लेटचे एक पाकीट विक्री करायला गेला तर ते 200 ते 300 रुपयांना विकले जाते. अशाप्रकारे तुम्ही एका दिवसाला एक हजार प्लेट बनवल्या तर महिन्याला 60 ते 80 हजार रुपये तुम्ही मिळवू शकतात. यामध्ये खर्च वजा करून तुम्ही महिन्याला 50 हजार रुपयांचे कमाई तर आरामात करू शकतात. विशेष म्हणजे या उद्योगात पक्का माल तयार झाल्यानंतर काही कचरा शिल्लक राहतो व तो देखील तुम्ही 50% किमतीत पुनर्वापरासाठी विकू शकतात.
कशी करावी या व्यवसायात वाढ?
थर्माकोल व्यतिरिक्त तुम्ही पेपर कप आणि वाटी बनवण्याचे मशीन तीन लाख रुपयांपर्यंत विकत घेऊन वाटी आणि पेपर कप देखील बनवू शकता. सध्या बाजारामध्ये कॉफी आणि कोल्ड्रिंक्स करिता पेपर कप आणि ग्लासचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामध्ये जर तुम्ही रेस्टॉरंट किंवा कंपन्याशी करार केला व तुमचे लेबल्स वापरून वस्तू तयार करून त्यांना पुरवल्या तर चांगली कमाई या माध्यमातून तुम्ही करू शकता व दीर्घकालीन कमाईचा स्त्रोत त्या माध्यमातून निर्माण करू शकतात.
सरकारकडून अनुदान देखील मिळते
सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्यामधील एक पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असून या माध्यमातून तुम्ही या व्यवसायाकरिता 90% पर्यंत कर्ज मिळवू शकतात. तसेच खादी ग्रामोद्योग मध्ये डिसपोसेबल केटरिंग उत्पादन बनवण्याचा व्यवसाय देखील समाविष्ट करण्यात आला आहे. या सर्व योजनांमध्ये व्यवसाय करण्यासाठी 90% पर्यंत कर्जसुविधा मिळते व खादी, ग्रामोद्योग आणि इतर अनेक योजनांमध्ये कर्जाच्या रकमेवर जे काही व्याज आकारले जाते त्यावर अनुदान देखील मिळते. या व्यवसायाच्या प्रकल्पाकरिता तुम्हाला 25% पर्यंत अनुदान मिळू शकते.