Poultry Farming:- कुठलाही व्यवसाय आपल्याला जर वाढवायचा असेल व त्या माध्यमातून जर चांगले आर्थिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एका दिवसात किंवा एका रात्रीत किंवा काही महिन्यात तो व्यवसाय मोठा होत नाही व आपल्याला अपेक्षित असलेले उत्पन्न लगेच मिळायला लागत नाही.
याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते व व्यवसाय वाढीसाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात. आज आपण समाजामध्ये कुठल्याही व्यवसायातील जे काही यशस्वी लोक बघतो ते एका रात्रीत यशस्वी झालेले नसतात.

त्यांच्या यशामागे अनंत प्रकारच्या अडचणी व त्या अडचणींवर केलेली मात, व्यवसाय वाढीसाठी केलेले दिवस रात्रीचे प्रयत्न व लागणारी जिद्द इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी यामागे असतात.
तेव्हा कुठे व्यक्ती यशस्वी होत असते. हा मुद्दा जर आपल्याला समजूनच घ्यायचा असेल तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या अनकवाडे येथील राजेंद्र कौतिक आणि भिका कौतिक जाधव या दोन भावांचे उदाहरण घेता येईल. या दोन्ही भावांपैकी भिका जाधव यांनी छोट्या प्रमाणामध्ये अगोदर अंडे विक्री व्यवसाय सुरू केला व पुढे चालून त्यांनी स्वतःची लेयर पोल्ट्री उभी केली व आज त्या माध्यमातून त्यांनी अनन्यसाधारण अशी प्रगती केली आहे.
पोल्ट्री व्यवसायातून साधली आर्थिक प्रगती
जर आपण भिका कौतिक जाधव यांची सुरुवात जर बघितली तर बारावीची परीक्षा दिल्यानंतर ते बारावीमध्ये नापास झाले. बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर मात्र नापास झाल्यामुळे आता पुढे काय करावे हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्यावेळी त्यांचे मोठे बंधू शेती व्यवसाय करत होते.
परंतु शेती त्यांची डोंगराळ भागात असल्यामुळे शेतीसाठी करावा लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन यांच्यामध्ये खूप मोठी तफावत असल्यामुळे हाती एक रुपया देखील राहत नव्हता. म्हणून शेतीला काहीतरी जोडधंदा असेल तर दोन पैसे हातात राहतील या उद्देशाने भिका जाधव यांनी अंडी विकण्याचा व्यवसाय सुरू करायचा ठरवला व तो सुरू देखील केला.
2002 पासून भिका परिसरातील पोल्ट्री फार्म मधून अंड्यांची खरेदी करून ते किरकोळ विक्रेत्यांपर्यंत विक्री करण्याचे काम करू लागले. परंतु हा व्यवसाय करत असताना आपण बाहेरून अंडे खरेदी करून विकतो त्यापेक्षा जर आपण स्वतःचे पोल्ट्री उभारली व त्यातूनच जर अंडी तयार करून त्यांची विक्री केली तर?हा प्रश्न भिका यांच्या मनामध्ये उभा राहिला व त्यांनी स्वतःची पोल्ट्री सुरू करायचे ठरवले.
परंतु पोल्ट्री सुरू करायची म्हणजे त्याला भांडवल लागणारच व ते त्यांच्याकडे मात्र न होते. या विषयावर त्यांनी मित्रासोबत एकदा चर्चा केली व एका मित्राने भिका यांना म्हटले की आपण पार्टनरशिप मध्ये पोल्ट्री फार्म उभारू.
तेव्हा दोघांनी घरचं काही भांडवल आणि काही कर्ज रूपाने पैसा उभारला व 2013 मध्ये 165 बाय 40 फूट शेड उभारून लेयर पोल्ट्री फार्मिंगमध्ये पाऊल ठेवले व हळूहळू प्रगती करत जात 2021 मध्ये परत 85 बाय 40 आकाराचे पोल्ट्री शेड उभारले व दोन्ही मिळून आज त्यांच्याकडे 12000 पक्षांची क्षमता असलेले दोन शेड आहेत
अंडी उत्पादनासाठी केले जाते पक्षांचे संगोपन
त्यांच्या व्यवसायाची स्ट्रॅटेजी बघितली तर ते परिसरात असलेल्या खाजगी अंडी उबवणूक केंद्रातून पंधरा आठवड्यांच्या पक्षांची खरेदी करतात व पुढे त्यांचे पंधरा महिने त्यांच्या स्वतःच्या शेडमध्ये संगोपन करतात. पक्ष्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी एका जाळीच्या साह्याने त्यांना लेयर पद्धतीत ठेवले जाते.
खाद्य व्यवस्थापनामध्ये 50% तयार खाद्य आणि इतर घरच्या शेतात पिकणारा मका भरड त्यासाठी वापरला जातो. ज्यावर प्रतिपक्षी 300 ते 340 अंडी देतात व वेळोवेळी पाण्यातून लसीकरण करणे आणि प्रतिजैविके देखील दिले जातात.
कसे आहे आर्थिक गणित?
अंड्यांचे जर आपण आज बाजारभाव पाहिले तर ते दररोज कमी अधिक होत असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून अंड्यांच्या उद्देशाने सुरू केलेल्या त्यांच्या या पोल्ट्री व्यवसायाचे उत्पन्न देखील कमी अधिक होत असते.
परंतु तरीदेखील मजुरी तसेच खाद्य व लागणाऱ्या औषधोपचार यावरील खर्च वजा जाता वर्षाला सात ते आठ लाख रुपये त्यांना उत्पन्न मिळते. यासोबतच कोंबडी खताला मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे जागेवरच खताची विक्री होते. यामध्ये 60 किलो गोणी 300 रुपये आणि दोन चाकी ट्रॅक्टर ट्रॉली खत हे तेरा ते चौदा हजार रुपये पर्यंत विकले जाते.