Tiranga Flag : शाळा किंवा कॉलेजमधील राष्ट्रीय सणांचे सोहळे आजही अनेकांच्या आठवणीत ताजे आहेत. खरंतर येत्या चार दिवसांनी देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
दरवर्षी देशात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि सर्वजण देशभक्तीमध्ये तल्लीन होतात. खरे तर कोणताही राष्ट्रीय सण असो मग तो 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन असो किंवा 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन असो सगळेजण मोठ्या उत्साहात हे राष्ट्रीय सण साजरा करतात.

देशभरातील सर्वच शाळांमध्ये हे राष्ट्रीय सण आनंदाने साजरा केले जातात. राष्ट्रीय सणाच्या दिवशी शाळेत ध्वजारोहण किंवा ध्वज फडकवण्याची रीत आहे. शाळेत तसेच प्रत्येक गावांमधील ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण किंवा ध्वज फडकवला जातो.
पण हा 15 ऑगस्ट रोजी आणि 26 जानेवारी रोजी जो 16 साजरा होतो तो एकसारखा वाटत असला तरी देखील त्यामध्ये काही घटनात्मक फरक आहेत. यामुळे आज आपण हे घटनात्मक फरक नेमके कसे आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत.
आजही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला तिरंगा डौलाने फडकताना पाहिला की प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. मात्र, हे दोन दिवस केवळ तारखांनीच नव्हे, तर त्यामागील अर्थ, प्रोटोकॉल आणि ध्वज फडकवण्याच्या पद्धतीमुळेही वेगळे ठरतात.
15 ऑगस्टला ध्वजारोहण होते
दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अनेकांना वाटते की या दोन्ही दिवशी राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रक्रिया एकसारखीच असते. पण प्रत्यक्षात या दोन्ही सणांमधील ध्वजविधीत महत्त्वाचा घटनात्मक फरक आहे.
15 ऑगस्ट रोजी ध्वज खांबाच्या खाली बांधलेला असतो आणि दोरीच्या साहाय्याने वर नेऊन फडकवला जातो. या प्रक्रियेला ‘ध्वजारोहण’ म्हटले जाते. ब्रिटिश राजवटीचा शेवट होऊन स्वतंत्र भारताचा तिरंगा उंचावल्याचे हे प्रतीक मानले जाते.
प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकवला जातो
याउलट, 26 जानेवारी रोजी तिरंगा आधीच खांबाच्या सर्वोच्च टोकाला बांधलेला असतो. केवळ दोरी ओढून तो उलगडला जातो, ज्याला ‘ध्वज फडकवणे’ किंवा ‘अनफर्लिंग’ असे म्हणतात. याचा अर्थ भारत आधीच स्वतंत्र असून, संविधान लागू झाल्यानंतर तो एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उभा राहिला आहे.
या दोन्ही दिवसांमध्ये ध्वज फडकवणाऱ्या व्यक्तीमध्येही फरक दिसून येतो. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. कारण 1947 मध्ये संविधान अस्तित्वात नव्हते आणि पंतप्रधानच सरकारचे प्रमुख होते. तर प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर राष्ट्रपती ध्वज फडकवतात, कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुख असतात.
15 ऑगस्ट हा गुलामगिरीतून मुक्तीचा दिवस आहे, तर 26 जानेवारी हा संविधान, कायदा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तिरंगा फडकताना पाहताना, या दोन दिवसांमागील सूक्ष्म पण महत्त्वाचे फरक लक्षात ठेवणे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब ठरेल.













