Tomato Farming : मराठवाडा हा दुष्काळी भाग, दुष्काळी भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना सततच्या नापिकीचा सामना करावा लागतोय. पण अशा या संकटाच्या काळातही मराठवाड्यातील काही शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून लाखोंची कमाई मिळवत आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानेही अवघ्या अर्धा एकर शेत जमिनीत टोमॅटोची लागवड करून चार लाखांची कमाई काढली आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा विविध संकटांमुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी कंधार तालुक्याच्या या प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग हा एक नवीन दिशा दाखवणारा ठरत आहे.
कंधार तालुक्यातील बाचोटी येथील युवा शेतकरी शिवहार अशोक पाटील भोसकर यांनी ही किमया साधली आहे. त्यांनी अफाट कष्टाच्या आणि योग्य नियोजनाच्या जोरावर टोमॅटो पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. शिवहार हे नेहमीच आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात.
ते फळबागांची सुद्धा लागवड करतात. पण z गेल्या वर्षी अर्थातच सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी आपल्या वीस गुंठे जमिनीत टोमॅटो पिकाची लागवड केली. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी पाच बाय दीड या अंतरावर बेड तयार करून शेणखत टाकले.
त्यानंतर ठिबक प्रणाली बसवून मल्चिंग अंथरले. यावर त्यांनी ७००० गावरान टोमॅटो रोपांची लागवड केली. टोमॅटो लागवड झाल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांना एका तोडणीतून 80 कॅरेट माल मिळत होता मात्र आता 110 कॅरेट माल मिळतोय.
त्यांनी आत्तापर्यंत दहा ते बारा तोडण्या पूर्ण केल्या आहेत आणि त्यांना यातून 1200 कॅरेट टोमॅटोचे उत्पादन झाले आहे. जेव्हा त्यांचे टोमॅटो विक्रीसाठी तयार झाले तेव्हा त्यांना ₹800 रुपये प्रति कॅरेट असा दर मिळाला होता मात्र सध्या हा भाव 150 रुपये प्रति कॅरेटपर्यंत खाली आला आहे.
गेल्या आठ दिवसाच्या कालावधीत टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र असे असले तरी शिवहार यांना या पिकातून चार लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. साहजिकच भाव पडले नसते तर उत्पन्नात आणखी वाढ झाली असती. पण, आतापर्यंत अर्धा एकर जमिनीतून त्यांना लाखोंची कमाई झाली असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान आहे.
शिवहार यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना टोमॅटो पीक उत्पादीत करण्यासाठी एक लाखाहून अधिकचा खर्च करावा लागला. त्यांना मल्चिंग, रोपे, शेणखत, रासायनिक खते-औषधे, तार, बांबू, सुतळी यांसाठी एक लाख दहा हजार रुपये खर्च आलाय. म्हणजे खर्च वजा जाता त्यांना 3 लाख 30 हजार रुपयांचा निव्वळ नफा या ठिकाणी मिळाला आहे.