काय सांगता ! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची गरजच नाही ; गाईच्या शेणाने चालवता येणार ट्रॅक्टर, ‘या’ कंपनीने केलं हे भन्नाट संशोधन

Ajay Patil
Published:

Tractor Run On Cow Dung : अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता अल्पभूधारक ते सधन शेतकरी सर्वजण ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करत आहेत. यामुळे निश्चितच शेतीची कामे वेळेवर केली जात आहेत. शिवाय यामुळे मजूर टंचाईमुळे निर्माण झालेली एक मोठी अडचण दूर झाली आहे.

निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टीने ट्रॅक्टर हे एक महत्त्वाचे यंत्र आहे. पेरणीपूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत आणि काढणीनंतर बाजारात शेतमाल नेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी ट्रॅक्टरची आवश्यकता शेतकऱ्यांना भासत आहे.

मात्र, या महागाईच्या काळात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने कुठे ना कुठे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्यासाठी अधिक उत्पादन खर्च शेतकऱ्यांना लागत आहे. यामुळे यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांना फायदे होत असले तरीदेखील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी खर्चिक बाब बनत आहे. मात्र आता यावर लवकरच तोडगा निघणार आहे. आता डिझेल नव्हे तर गाईच्या शेणापासून चालणारे ट्रॅक्टर बनवलं जाणार आहे.

ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र न्यू हॉलंड या कंपनीने द्रवरूप मिथेनवर चालणारा एक ट्रॅक्टर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की द्रवरूप मिथेन हे गाईच्या शेणापासून सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. यामुळे, डिझेल साठी होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचणार असून डिझेलच्या वापराने जे काही कार्बन उत्सर्जन होते यामध्ये देखील मोठी घट होणार असल्याचा दावा सदर कंपनीकडून करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बायोमेथेन उत्पादनावर संशोधन करणाऱ्या बेन्नमन या कंपनीने ट्रॅक्टर मधील सदर टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. या कंपनीने विकसित केलेल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून द्रवरुपमिथेन वर 270 हॉर्स पावर क्षमतेचा ट्रॅक्टर सामान्य ट्रॅक्टर म्हणजे डिझेलचलित ट्रॅक्टर सारखाच शेती काम करण्यास सक्षम राहणार असल्याचा दावा आहे.

आता या ट्रॅक्टरसाठी आवश्यक इंधन मिळवण्यासाठी, फार्मबेस्ड बायोमिथेन स्टोरेज युनिटमध्ये साधारण 100 गायींच्या शेणाचे, मलमुत्राचे फ्युजिटिव्ह मिथेन नावाच्या इंधनात रुपांतर केल जाऊ शकणार आहे. हे इंधन ट्रॅक्टर मध्ये बसवण्यात आलेल्या क्रायोजनिक टाकीत 162 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवलं जाईल. विशेष म्हणजे याचं टेस्टिंग ट्रायल कॉर्नवॉल मध्ये झालं ज्यामध्ये हा द्रवरुप मिथेन वर चालणारा ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टर प्रमाणेच धावला आहे.

या कंपनीच्या मते हा द्रवरूप मिथेन वर चालणारा जगातील पहिला ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. दरम्यान आता कंपनीच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा व्यापक वापराच्या शक्यता तपासण्यासाठी चाचपनी केली जात आहे. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी देखील याचा वापर करता येऊ शकतो अशी कंपनीला आशा आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe