तुरीचे बाजार भाव 12 हजारावरून 7 हजारावर, भविष्यात कसे राहणार दर ?

Tur Rate : मान्सून 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. मान्सून काळात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. यामुळे खरिपातील सोयाबीन कापूस पिकाचे नुकसान झाले.

मात्र जास्तीच्या पावसाचा फायदा तुर पिकाला झाला असून यंदा तुरीचे बंपर उत्पादन झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक प्रमुख बाजारांमध्ये तुरीची विक्रमी आवक होत असून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून नवीन तूर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत आहे.

सध्या जालनाच्या बाजारात नव्या तुरीला सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. अजून राज्य शासनाकडून हमीभावात तुरीची खरेदी सुरू झालेली नाही. यामुळे खुल्या बाजारात तुरीला अपेक्षित भाव मिळत नसून शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे तुरीचे आवक मे 2025 अखेरपर्यंत सुरू राहील असा दावा बाजारातील व्यापाऱ्यांनी केला आहे. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे आणि यामुळे सध्या तुरीचे दर स्थिरावले आहेत. खरंतर तीन महिन्यांपूर्वी तुरीचे दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

यामुळे नवीन तूर बाजारात आल्यानंतरही तुरीला चांगला दर मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण प्रत्यक्षात तुरीचे बाजार भाव साडेचार ते पाच हजार रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली असून आगामी काळात देखील बाजार भाव असेच पाहायला मिळू शकतात असा दावा अभ्यासकांकडून केला जातोय.

आगामी काळातही तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळेल असे बाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे. तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असल्याने यावर्षी तुरीची भावपातळी यादरम्यानच राहण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात जुन्या तुरीची आवक फारच कमी आहे, जुनी तूर फारच कमी शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. सध्या सर्वत्र नवीन तूर पाहायला मिळत असून नव्या तुरीला अपेक्षित दर मिळत नाहीये. जेव्हा बाजारात सुरुवातीला नवीन तूर आली होती तेव्हा दरात थोडीशी वाढ झाली. पण आता गेल्या काही दिवसांपासून तुरीची आवक वाढली असून बाजार भाव 7000 रुपये प्रति क्विंटल ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान स्थिरावले आहेत.

आगामी काळातही बाजारभाव याच दरम्यान पाहायला मिळू शकतात. बाजार अभ्यासकांनी याबाबत बोलताना असे सांगितले आहे की राज्य सरकारकडून ‘नाफेड’ची तूर खरेदी अद्याप सुरू झालेली नाही.

केंद्र सरकारकडून तूर आयात करण्यास एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याचा बाजारावर परिणाम होत आहे. यामुळेच तुरीचे भाव पडले आहेत. यामुळे आता आगामी काळात जेव्हा राज्य सरकारकडून तूर खरेदी सुरू होईल तेव्हा तुरीचे दर वाढणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe