तूर-सोयाबीन बाजारात तेजी; MSP च्या वर दर, मात्र शेतकऱ्यांचा फायदा मर्यादित?

Published on -

Tur Soybean Market : यंदाच्या खरीप हंगामात सरासरी उत्पादनात घट झाल्याचा थेट परिणाम शेतमालाच्या बाजारभावांवर दिसून येत आहे. विशेषतः तूर आणि सोयाबीनचे दर पहिल्यांदाच हमीभावाच्या (MSP) वर गेल्याने बाजारात तेजी निर्माण झाली आहे.

नाफेडमार्फत सुरू असलेल्या एमएसपी खरेदीमुळे दरांना आधार मिळाला असून, कापसाच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र, ही दरवाढ हंगामाच्या उत्तरार्धात झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुरीला दोन वर्षांतील उच्चांकी दर

अमरावती बाजार समितीत तुरीची आवक यंदा मर्यादित असून, तुरीला ८ हजार ते ८ हजार ७५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी मानला जात आहे.

शासनाने यावर्षी तुरीसाठी ८ हजार रुपये हमीभाव जाहीर केला असून, नाफेडमार्फत खरेदीपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. कमी आवक आणि एमएसपी खरेदीमुळे बाजारात दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोयाबीनला तीन वर्षांतील सर्वाधिक भाव

सोयाबीनच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. अमरावती बाजार समितीत ४ हजार ७३८ पोत्यांची आवक झाली असून, सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ४५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक दर ठरत आहे.

शासनाने सोयाबीनसाठी ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला असून, त्याच दराने एमएसपी खरेदी सुरू असतानाच खुल्या बाजारातही दर वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये हालचाल वाढली आहे.

‘लेमन’ तुरीचा परिणाम

कर्नाटकात तुरीचे उत्पादन घटल्याने आवक कमी झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीच्या उत्पादनात घट नोंदवली गेली आहे. आफ्रिकन देशांतून आयात होणाऱ्या ‘लेमन’ तुरीचे दर वाढल्याचा थेट परिणाम देशांतर्गत तुरीच्या बाजारभावांवर झाला आहे.

मागणी-पुरवठ्यातील तफावत

यंदा अधिक पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटल्याने सोयापेंडची मागणी वाढली असून, मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे सोयाबीनला उठाव मिळत आहे.

पुढील काळात दर टिकतील का?

सध्या तुरीची आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. मात्र, हंगाम पूर्णपणे सुरू झाल्यानंतर हे दर टिकून राहतात का, याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्याची दरवाढ दिलासादायक असली तरी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळेल का, हा प्रश्न मात्र कायम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe