UPS Pension Scheme : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन लागू करण्याची घोषणा केली आहे. नवीन पेन्शन स्कीमसाठी म्हणजेच एनपीएस स्कीम साठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही युनिफाईड पेन्शन स्कीम लागू होणार आहे. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ही युनिफाईड पेन्शन लागू केली आहे.
याबाबतचा निर्णय शिंदे सरकारने नुकताच घेतला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या नवीन युनिफाईड पेन्शन स्कीमची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच 50 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळणार? तसेच त्यांना किती फॅमिली पेन्शन मिळणार ? यासंदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत.
कशी आहे युनिफाईड पेन्शन स्कीम ?
केंद्रातील कर्मचाऱ्यांना ही युनिफाईड पेन्शन स्कीम एक एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. याबाबतचा निर्णय 24 ऑगस्ट 2024 ला घेण्यात आला आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना आता एक निश्चित पेन्शन मिळणार आहे तसेच फॅमिली पेन्शन देखील मिळणार आहे.
म्हणजेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर रक्कम पेन्शन म्हणून मिळेल तसेच रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराला सुद्धा खात्रीशीर फॅमिली पेन्शन मिळणार आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत 25 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के एवढी पेन्शन दिले जाणार आहे.
ज्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ सरकारी नोकरी केली आहे अशांना या अंतर्गत किमान दहा हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. तसेच रिटायरमेंट नंतर मयत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनच्या 60 टक्के रक्कम फॅमिली पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.
पण, UPS पेन्शन योजनेनूसार कर्मचाऱ्यांना दहा टक्के योगदान द्यावे लागणार आहे. सरकार 18.4 टक्के योगदान देणार आहे, तर कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी + डीए मिळून एकूण 10 टक्के योगदान द्यावे लागणार आहे.
50 हजार पगार असेल तर किती पेन्शन मिळणार ?
जर तुमच्या सेवा काळातील शेवटच्या 12 महीन्यांच्या बेसिक पगाराची सरासरी 50 हजार रुपये असेल तर त्यांना निवृत्तीनंतर युपीएस योजनेअंतर्गत 25 हजार रुपये (डीआर जोडून ) पेन्शन मिळणार आहे. अर्थातच 50 हजार सॅलरीवर पेन्शन = 50,000 रुपयांच्या रकमेवर 50% रक्कम + डीआर = 25,000 रुपये + डीआर दिला जाणार आहे.
तसेच मृत्यूनंतर कुटुंबियांना फॅमिली पेन्शन म्हणून दर महिन्याला 25000 च्या पेन्शनमधून 60 टक्के रक्कम मिळणार आहे. 25000 चे 60% म्हणजेच 15000 रुपये + डीआर पेन्शन म्हणून मिळणार आहे.