Uttar Paredesh : वाराणसी म्हणजेच काशी… जगातील सर्वात प्राचीन जिवंत शहर. अध्यात्म, श्रद्धा, परंपरा आणि संस्कृती यांचा अनोखा संगम असलेले हे शहर ‘मुक्तीचे द्वार’ म्हणून ओळखले जाते. गंगेच्या काठावर वसलेली काशी केवळ तीर्थक्षेत्र नसून जीवन आणि मृत्यूचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचे स्थान आहे.
दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक वाराणसीला भेट देतात. जर तुम्ही वाराणसी यात्रेचे नियोजन करत असाल, तर खालील ५ गोष्टी केल्याशिवाय तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण होणार नाही.

सर्वात आधी उल्लेख करावा लागेल तो दशाश्वमेध घाटावरील गंगा आरतीचा. दररोज संध्याकाळी होणारी ही महाआरती पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
सात पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपांच्या प्रकाशात होणारी आरती गंगेच्या पाण्यावर प्रतिबिंबित होताना पाहणे मनाला शांती देते. आरती जवळून पाहायची असल्यास किमान तासभर आधी घाटावर पोहोचणे किंवा बोटीमधून आरती पाहण्याचा पर्याय निवडता येतो.
काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन आणि गंगा स्नान हे वाराणसी यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिराला अपार महत्त्व आहे.
दर्शनापूर्वी गंगेतील स्नान पवित्र मानले जाते. नव्याने उभारलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे मंदिर परिसर अधिक भव्य, स्वच्छ आणि भाविकांसाठी सोयीस्कर झाला आहे.
वाराणसीतील सकाळचा नौकाविहार हा अनुभवही तितकाच खास आहे. सूर्योदयाच्या वेळी गंगेवर नौकाविहार करताना अस्सी घाट ते मणिकर्णिका घाट असा प्रवास करताना ८४ घाटांचे दर्शन घडते. घाटांवरील पूजा, योग, ध्यान आणि दैनंदिन जीवन पाहताना काशीची खरी ओळख समोर येते.
यासोबतच वाराणसीची स्थानिक खाद्यसंस्कृती अनुभवणे गरजेचे आहे. बनारसी पान, कचौरी-भाजी, जिलेबी, हिवाळ्यात मिळणारे मलाईयो आणि मातीच्या कुल्हडमधील दाट लस्सी यांची चव आजही पर्यटकांच्या स्मरणात राहते.
शेवटी, मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांचे दर्शन जीवनाचे अंतिम सत्य समजावून देते. येथे अखंड पेटलेली चिता जीवन-मरणाच्या चक्राची जाणीव करून देते.
याशिवाय बनारसी साडी खरेदी, संकट मोचन मंदिर दर्शन आणि जवळच असलेल्या सारनाथला भेट दिल्यास वाराणसी यात्रा अधिक संस्मरणीय ठरते.













