Vande Bharat Express : भारतीय रेल्वेची अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या विशेष पसंतीस उतरत असून, वाढती प्रवासीसंख्या आणि गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेसला चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे ही ट्रेन आता १६ ऐवजी २० कोचसह धावणार आहे. या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना थेट लाभ मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22961/22962) मध्ये हा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती मागणी, तिकिटांची उपलब्धता कमी पडणे आणि गर्दीचे प्रमाण वाढणे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

तात्पुरत्या स्वरूपात चार अतिरिक्त कोच जोडले जाणार असून, ही व्यवस्था 26 जानेवारी 2026 ते 7 मार्च 2026 या कालावधीत लागू राहणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
मुंबई सेंट्रलहून सुटणारी ही वंदे भारत एक्सप्रेस बोरिवली, वापी, सुरत आणि वडोदरा येथे थांबे घेत अहमदाबादला पोहोचते. हा मार्ग पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक व्यस्त आणि महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मानला जातो.
दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. अतिरिक्त कोच जोडल्यामुळे आसनक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असून, वेटिंग लिस्ट कमी होण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत वंदे भारत ट्रेनला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्या देशात 164 हून अधिक वंदे भारत सेवा कार्यरत असून, त्यापैकी 11 सेवा महाराष्ट्रातून धावत आहेत. मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने क्षमतेत वाढ करण्याची गरज निर्माण झाली होती, ती आता पूर्ण होत आहे.
दरम्यान, वंदे भारत चेअर कारच्या यशानंतर भारतीय रेल्वेने स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची तयारी केली असून, पुढील काळात 200 हून अधिक स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप आखण्यात आला आहे.
याच कालावधीत, कर्णावती एक्सप्रेस (12933/12934) ही ट्रेन तात्पुरती मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून धावणार असल्याने प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.













