Vande Bharat Express : भारताच्या नवीन सेमी-हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसने देशातील रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलला आहे. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील 11 गाड्या आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते मडगाव सीएसएमटी ते जालना मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाची बाब अशी की वंदे भारत एक्स्प्रेसच्या मोठ्या यशानंतर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस गाड्याही लवकरच रुळावर येणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सध्या देशातील प्रीमियम ट्रेनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
वंदे भारतमध्ये सध्या प्रवाशांसाठी एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास या दोन वर्गांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट कॅन्सल झाल्यास रेल्वे प्रवाशांकडून किती पैसे वसूल करते? नाही ना मग आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट काही कारणास्तव कॅन्सल करावे लागले तर प्रवाशांना किती शुल्क भरावे लागते याबाबत रेल्वेचे नियम काय आहेत याबाबत माहिती जाणून घेण्याचा आजचा आपला हा प्रयत्न. बुक केलेले तिकीट रद्द केल्यावर भारतीय रेल्वे रद्दीकरण शुल्क आकारते.या कॅन्सलेशन चार्जमधून रेल्वेला दरवर्षी करोडो रुपयांची कमाई होते.
जर तुम्ही वंदे भारत एक्स्प्रेसच्या एसी चेअर कारमध्ये तिकीट बुक केले असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला तिकीट रद्द करावे लागले, तर रेल्वे तुमच्याकडून तिकिटाच्या मूळ किमतीपासून 180 रुपये कॅन्सलेशन चार्ज आकारेल आणि उर्वरित रक्कम परत करेल.
याशिवाय, जर तुम्ही वंदे भारत एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये तिकीट बुक केले असेल, जे आता रद्द करावे लागेल, तर तुमच्या तिकिटाच्या मूळ किमतीतून 240 रुपये कापले जातील.
तिकीट रद्द करताना तुम्हाला आरक्षण शुल्क आणि जीएसटी परत केला जात नाही. तिकीट रद्द केल्यावर, तिकीटाच्या मूळ किमतीतून रद्दीकरण शुल्क वजा केल्यावर उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाते.