Vande Bharat Express :भारतीय रेल्वेकडून देशभरातील अनेक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची योजना आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीने तयार केलेल्या सेमी-हायस्पीड ट्रेन केवळ अनेक शहरांमधील दळणवळण सुधारताना दिसत आहे. देशभरात सध्या १३६ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू आहेत. प्रवाशांच्या सोयी आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आता नागपूर आणि मुंबई वंदे भारत ट्रेन देखील सुरू होणार आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानीतील प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होणार आहे.
फक्त 9 तासांचा प्रवास
नागपूर ते मुंबई दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत धावण्याची अपेक्षा आहे. नागपूर-सीएसएमटी (मुंबई) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ८३७ किमी अंतर ९ तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करेल.

कोठे असतील थांबे?
नागपूर ते मुंबई या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेसला कोठे थांबे असतील, हेही सांगण्यात आले आहे. त्यात ही रेल्वे वर्धा जंक्शन, बडनेरा जंक्शन, अकोला जंक्शन, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन आणि दादर यासारख्या प्रमुख स्थानकांवर थांबेल, असे सांगण्यात आले आहे.
किती असेल वेग?
नागपूर ते मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. मुंबई ते नागपूर या मार्गावरील ही सर्वात वेगवान रेल्वेगाडी असेल.
किती असेल भाडे?
नागपूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये आठ कोच असतील. यामध्ये १ एक्झिक्युटिव्ह एसी आणि ७ एसी चेअर कार कोच असतील. नागपूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसीमध्ये प्रवास करण्याचे भाडे अनुक्रमे १६०० आणि २६०० रुपये असण्याची शक्यता आहे.
कशा असणार ट्रेनच्या वेळा?
नागपूरहून मुंबईला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस गाडी नागपूरहून पहाटे ०५:०० वाजता निघून सीएसएमटीला दुपारी २ वाजता पोहोचेल अशी अपेक्षा आहे. परतीच्या प्रवासात, ही ट्रेन सीएसएमटीहून सुमारे १५:०० वाजता निघेल आणि नागपूरला २३:५० वाजता पोहोचेल असे सांगितले जात आहे.